
उडुपी जिल्हा राज्यात अव्वल; चिक्कोडी २४ व्या, तर बेळगाव २६ व्या स्थानावर
बंगळूर : चालू शैक्षणिक वर्षातील द्वितीय पीयूसी परीक्षा-१ चा निकाल जाहीर झाला असून, राज्याने यंदा ८६.४८ टक्के असा विक्रमी निकाल नोंदवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १३.०३ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुपारी ३ वाजता निकाल जाहीर करण्यात आला.
शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेत समाधान व्यक्त करत हा निकाल ऐतिहासिक असल्याचे सांगितले. यंदा डिजिटल प्रणालीला अधिक प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना वेबसाइट, मोबाईल अॅप तसेच डिजिलॉकरद्वारे निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावर्षी परीक्षेला एकूण ७,१०,३६३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सुमारे ६.१ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. गेल्या वर्षी निकालाची टक्केवारी ७३.४५ टक्के इतकी होती.
निकालात झालेल्या या वाढीमागे उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे किमान गुण ३५ वरून ३३ पर्यंत कमी करण्याचा निर्णय हा एक महत्त्वाचा घटक मानला जात आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वीच शालेय शिक्षण मंत्र्यांनी यंदा चांगल्या निकालाची अपेक्षा व्यक्त केली होती आणि ती प्रत्यक्षातही उतरली आहे.
गेल्या वर्षी ६,३७,८०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४,६८,४३९ विद्यार्थी उत्तीर्ण, तर १,६९,३६६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते.
परिपूर्ण गुण मिळवणाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय
यंदाच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले असून, काहींनी ६०० पैकी ६०० गुण मिळवत विशेष कामगिरी केली आहे. वाणिज्य शाखेत जैन महाविद्यालयाची विद्यार्थिनी अदिती बापू तसेच दक्षिण कन्नडमधील आळ्वास महाविद्यालयातील दिशा हिने परिपूर्ण गुण मिळवून राज्यात लक्ष वेधले आहे.
विभागनिहाय निकाल
कला – ७२ टक्के
वाणिज्य – ८८.०४ टक्के
विज्ञान – ९१.६९ टक्के
मुलींचे वर्चस्व कायम
एकूण ६,४८,८५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,६५३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. नेहमीप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतली असून ८८.७० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांचे प्रमाण ८३.६५ टक्के आहे. ग्रामीण भागात ८७.६२ टक्के आणि शहरी भागात ८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
९ विद्यार्थ्यांनी ५९० पेक्षा जास्त गुण मिळवले
वाणिज्य विभागातील ९ विद्यार्थ्यांनी ५९० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एकाच महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी वाणिज्य विभागात ही कामगिरी केली आहे.
बंगळूर येथील राजाजीनगरमधील एएससी कॉलेजचे ९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्वाधिक गुण मिळवणारे टॉपर
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अल्वा कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या दिशाने वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कला विभागात, बेळ्ळारी जिल्ह्यातील कोट्टूरू येथील इंदू कॉलेजच्या अर्चना आणि संगीता या दोन विद्यार्थिनींनी ६०० पैकी ५९८ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
विज्ञान श्रेणीमध्ये, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील शामन्यू एस. शेट्टी याने ६०० पैकी ५९८ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
आईच्या निधनावर मात; दिशाने मिळविले पैकीच्या पैकी गुण
बारावी परीक्षेत मंगळूरच्या आळ्वास महाविद्यालयातील विद्यार्थिनी दिशा हिने वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. परीक्षेदरम्यान तीन पेपरनंतर तिच्या आईचे निधन झाले होते. या दु:खातून सावरत तिने उर्वरित परीक्षा देऊन ही उल्लेखनीय कामगिरी केली. दिशाने आपल्या यशाचे श्रेय आईच्या प्रेरणेला आणि शिक्षकांच्या पाठिंब्याला दिले. तिची ही जिद्द आणि चिकाटी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
डिजिटल माध्यमातून निकाल उपलब्ध
विद्यार्थ्यांना आपला निकाल https://karresults.nic.in या संकेतस्थळावर, ‘कर्नाटक वन’ मोबाईल अॅपवर तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप/एसएमएसद्वारे मिळणार आहे. याशिवाय, प्रथमच निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजिलॉकरवर अपलोड करण्यात आल्या असून https://www.digilocker.gov.in वरून त्या डाउनलोड करता येतील, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
जिल्हानिहाय आघाडी
यंदा उडुपी जिल्ह्याने ९६.३९ टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला असून, दक्षिण कन्नड (९६.३५ टक्के) दुसऱ्या स्थानावर आहे. तर यादगिरी जिल्हा ७१.२१ टक्के निकालासह शेवटच्या क्रमांकावर राहिला.
महत्त्वाचे जिल्हानिहाय निकाल
क्रमांक/ जिल्हा/ निकालाची टक्केवारी
१. उडुपी / ९६.३९
२. दक्षिण कन्नड / ९६.३५
३. कोडगू / ९२.३४
४. विजयपूर / ९२.००
५. उत्तर कन्नड / ९१.७८
६. बंगळुर ग्रामीण / ९१.००
७. चिक्कमगळूर / ९०.८०
८. बंगळुर दक्षिण / ९०.५५
९. चिक्कबळ्ळापूर / ९०.२४
१०. बंगळुर उत्तर / ९०.०५
११. हासन / ८९.७१
१२. मांड्या / ८८.८५
१३. रामनगर / ८७.९०
१४. कोलार / ८७.३८
१५. शिवमोग्गा / ८७.६२
१६. तुमकूर / ८६.८९
१७. कोप्पळ / ८६.८०
१८. चामराजनगर / ८४.६८
१९. म्हैसूर / ८४.८०
२०. बीदर / ८४.६१
२१. बागलकोट / ८४.१२
२२. हावेरी / ८४.११
२३. धारवाड / ८३.३१
२४. चिक्कोडी / ८३.१०
२५. दावणगेरे / ८१.९९
२६. बेळगाव / ८०.३२
२७. चित्रदुर्ग / ७९.१२
२८. बळ्ळारी / ७८.६९
२९. गुलबर्गा / ७६.९७
३०. गदग / ७६.६५
३१. रायचूर / ७४.०९
३२. यादगिरी / ७१.२१
Belgaum Varta Belgaum Varta