बेंगळुरू : राज्यसभेच्या दुसर्या टर्मसाठी राज्यसभेची निवडणूक लढवत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेते जग्गेश यांनी आज कर्नाटकातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निर्मला सीतारामन यांच्या समवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी बंगळुरू येथील गवी गंगाधरेश्वर मंदिराला भेट देऊन, विशेष पूजा करून दर्शन घेतले. मंदिरात आगमन होताच अर्थमंत्र्यांचे महिला भाजप कार्यकर्त्यांनी आरती करून, हळद-कुंकू लावून मंत्रोपचारात स्वागत केले.
दरम्यान, भाजपकडून लेहरसिंग यांनीही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. निर्मला सीतारामन यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, निर्मला यांना कर्नाटकमधून निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. दोन्ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकू. तिसर्या जागेवर लढणार्या लेहरसिंग यांना विजयी करण्यासाठी सर्व प्रयत्न करून ती जागासुद्धा आम्ही जिंकू. राज्यसभेवर कर्नाटकमधून तीन जणांची निवड करण्यासाठी मुख्यमंत्री, मी आणि प्रदेशाध्यक्ष एकत्रित काम करू असे त्यांनी सांगितले.
