अभ्यास करून निर्णय घेणार, लेखक, कवींचा वाढता विरोध
बंगळूर : पाठ्यपुस्तक पुनरावृत्ती वादाच्या संदर्भात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश उद्या (ता. २) अहवाल सादर करतील. या अहवालाचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सांगितले. राज्यातील मानसिकतेला हादरवून सोडणाऱ्या वादाच्या संदर्भात सर्वसमावेशक अहवाल मागवला असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कांही कन्नड लेखक व कवीनी आपल्या साहित्य प्रकाराचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यास दिलेली संमत्ती मागे घेत असल्याची शिक्षणमंत्र्यांना पत्रे लिहिली आहेत.
शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांचा अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तो २ जूनला पोहोचेल. पाठ्यपुस्तकात केलेल्या पुनरावृत्तीच्या बाजूने कांही लोक आहेत. त्यामुळे सर्व बाजूंचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. काही लेखकांना त्यांचा मजकूर अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांचे धडे शिकवावेसे वाटत नसल्याबाबत, आपण त्यांचाही सल्ला घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.
कवी, लेखकांचाही वाढता विरोध
शालेय पाठ्यपुस्तकांच्या पुनरावृत्तीवरून वाद निर्माण होत असल्याने, कवी मुदनाकुडू चिन्नास्वामी आणि रूपा हसन यांनी मंगळवारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांना पाठ्यपुस्तकांतील कवितांची परवानगी काढून घेत आत असल्याचे पत्र लिहिले. चिन्नास्वामी म्हणाले की, मी इयत्ता ५ वी मधील कन्नड पाठ्यपुस्तकातील माझी ‘नन्न कवितेगे’ कवितेची मान्यता परत घेत आहे, तर रूपा म्हणाल्या, की माझी कविता ‘अम्मानागुवुदादरे’ नववीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करू नये.
गेल्या काही दिवसांपासून हंपा नागराजय्या यांनी राष्ट्रकवी कुवेंपू प्रतिष्ठानमधून राजीनामा दिला आहे, तर रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समितीने पाठ्यपुस्तकांच्या कथित भगवीकरणाचा निषेध करत राष्ट्रकवी एस शिवरुद्रप्पा प्रतिष्ठानचे प्रा. एस. जी. सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला आहे.
चिन्नास्वामी म्हणाले की, पाठ्यपुस्तकांचे भगवेकरण, बसवण्णांबद्दल चुकीची माहिती आणि राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या अपमानामुळे कन्नड साहित्यिक जग हैराण झाले आहे, जे कन्नड सांस्कृतिक चेतनेचा अपमान आहे.
शिक्षण क्षेत्र, ज्याने भावी पिढ्यांना घडवायचे आहे आणि एक निरोगी समाज निर्माण करण्यास मदत करायची आहे, अनैच्छिक मुद्द्यांवरून होणारे आक्रमण खेदजनक आहे,अशी त्यांनी टिप्पणी केली.
चक्रतीर्थने निवडलेल्या अभ्यासक्रमावर आपण खूश नसल्याचे रूपा म्हणाल्या. नको त्या अभ्यासक्रमाचा समावेश करून आणि महत्त्वाचे विचार वगळून सरकारने लेखक-कवींचा अपमान केला आहे, असेही त्या म्हणाल्या. दहावी कन्नड अभ्यासक्रमात महिला लेखक आणि विद्वानांच्या कविता किंवा ग्रंथांचा समावेश न केल्याने सरकारने त्यांची उपेक्षा केली आहे. काही पुरोगामी विचारवंतांनी डॉ. बी.आर. आंबेडकरांवरील एका अध्यायातील आणखी एका दोषाकडे लक्ष वेधले, ते म्हणाले की त्यांनी बौद्ध धर्मात सामील होण्याची कारणे लपविली आहेत.
काटकरांकडूनही संमती मागे
बेळगावचे कन्नड कवी, लेखक व ज्येष्ठ पत्रकार सरजू काटकर यांनी नववीच्या तृतीय भाषा कन्नड पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या ‘नानू रचीसीद शब्दगळू’ या कवितेचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यास देण्यात आलेली संमती मागे घेत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांना पत्र लिहिले आहे.