संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी प्रसिद्ध चित्रकारांसाठी आपला चार तासांचा बहुमोल वेळ देऊन कलेचा गौरव केला. चित्रकारांनी निसर्गरम्य पत्रिबनात एकाच ठिकाणी तीन तास स्वामीजींना स्थिर बसण्यास भाग पाडत स्वामीजींचे सुंदर पोर्ट्रेट पेंटिंग चित्र रेखाटले. कर्नाटक महाराष्ट्र राज्यात नावाजलेल्या चित्रकारांना श्रींच्या अनुमतीने सदाशिव कुरबेट यांनी निमंत्रित केले होते. स्वामीजींचे पोट्रेट पेंटिंग चित्र रेखाटणे कार्यक्रमाचे नियोजन प्रा.जी. एस.मरीगुद्दी यांनी केले होते. चित्रकार जोतिबा फडके, महेश होनुले, चंद्रशेखर रांगणेकर (बेळगांव) अजय दळवी, विवेक कावली, उदय कुंभार, विजय तिपुगडे (कोल्हापूर), महेश पाटील (सांगली) यांनी श्रींना खुर्चिवर तब्बल तीन तास कसलीही हालचाल न करता खिळवून ठेवत श्रींचे सुंदर पोर्ट्रेट पेंटिंग चित्र रेखाटून आपली कला सादर केली आहे. श्रींनी चित्रकारांना कला सादर करण्यासाठी आपला बहुमोल वेळ देऊन कलेचा गौरव केला. दोघा चित्रकारांनी पत्रिबनाचे सुंदर निसर्ग चित्र तर सहा चित्रकारांनी श्रींचे पोर्ट्रेट पेंटिंग तयार केले आहे. श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी चित्रकारांच्या कलेची प्रशांशा करुन त्यांच्या कलेचा गौरव केला. उपरोक्त प्रसिद्ध चित्रकारांचे यापूर्वी चित्रांचे प्रदर्शन मुंबई, पुणे कोल्हापूर सांगली बेळगाव येथे भरले होते. त्याला उदंड प्रतिसादही लाभला होता. चित्रकारांनी रेखाटलेले पत्रीबनाचे सुंदर निसर्ग चित्र आणि पोर्ट्रेट पेंटिंग पाहून स्वामीजींनी चित्रकारांच्या कलेची तोंडभरून प्रशंसा केली आहे.
