Tuesday , April 22 2025
Breaking News

सशस्त्र दलांमधील महिलांची वाढती संख्या प्रेरणादायी

Spread the love

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा अमृत महोत्सव
बंगळूर : संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर व राष्ट्रपती रामनाथ कोविंद, यांनी देशाच्या सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वोच्च कमांडर या नात्याने, लढाऊ भूमिकांसह सशस्त्र दलांमध्ये महिलांची वाढती संख्या पाहून मला आनंद होत आहे, असे राष्ट्रपती बंगळुर येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या अमृत महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करताना म्हणाले.
मला हे लक्षात घेण्यास आनंद होत आहे की, अलीकडेच, कॅप्टन अभिलाषा बराक या आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये लढाऊ विमानचालक म्हणून सामील झालेल्या पहिल्या महिला अधिकारी झाल्या आहेत. मला विश्वास आहे की, या प्रतिष्ठित शाळेत प्रवेश घेणार्‍या मुली कॅडेट्स देशाच्या रक्षणासाठी योगदान देतील आणि राष्ट्र उभारणीत त्यांची भूमिका निभावतील, असे देशभरातील राष्ट्रीय सैनिकी शाळांमधून मुलींच्या कॅडेट्सना प्रवेश मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना शराष्ट्रपती कोविंद म्हणाले.
एनडीएमध्ये महिला
या वर्षापासून नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (एनडीए) चे दरवाजेही मुलींसाठी खुले करण्यात आले आहेत, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, आमच्या मुली अनेक काचेचे छत तोडत आहेत आणि विविध क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत, देशाचा गौरव वाढवत आहेत. जेव्हा मी देशभरातील विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये फिरतो, तेव्हा मुलींनी मुलांपेक्षा जास्त यश मिळवल्याची अनेक उदाहरणे मी पाहतो.
राष्ट्रीय लष्करी शाळांच्या इतिहासाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, लष्करी जवानांच्या वॉर्डांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने त्यांची संकल्पना करण्यात आली होती. मात्र नंतर या शाळा नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या.
राष्ट्रीय चरित्र
मला हे लक्षात घेताना आनंद होत आहे, की राष्ट्रीय लष्करी शाळा खरोखरच राष्ट्रीय आहेत. मला सांगण्यात आले आहे की, सध्या 23 राज्यांतील कॅडेट या शाळेत शिक्षण घेत आहेत. जम्मू आणि काश्मीर ते केरळपर्यंत येथील कॅडेट्स विविधतेतील आपल्या एकतेचे प्रतिनिधित्व करतात. मला खात्री आहे की या परस्परसंमेलनामुळे कॅडेट्सना त्यांच्या सहकारी कॅडेट्सची संस्कृती, भाषा आणि परंपरा जाणून घेण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले.
1946 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बंगळुरचे भरभरून कौतुक करताना ते म्हणाले की, शाळेने बराच पल्ला गाठला आहे आणि देशातील सर्वोत्तम बोर्डिंग शाळांपैकी एक म्हणून ओळखली जात आहे. शाळेला तिच्या समृद्ध वारशाचा न्याय्य अभिमान वाटू शकतो. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वतःला वेगळे केले आहे, असे ते म्हणाले. तुमच्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, तुमच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांपैकी एक, कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया यांना त्यांच्या धाडसी कृत्याबद्दल आणि कांगोमध्ये युएन ऑपरेशन दरम्यान सर्वोच्च बलिदान दिल्याबद्दल, देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आला, असे ते म्हणाले.
यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.
राजाधिराजा गोविंद मंदिराचे उद्घाटन
इस्कॉनने बांधलेल्या राजाधिराज गोविंद मंदिराचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 14) उद्घाटन झाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी इस्कॉनच्या नवीन राजाधिराज गोविंद मंदिर आणि सांस्कृतिक संकुलाचे उद्घाटन केले. कनकपुर रोडवरील वसंतपूरच्या विस्तीर्ण परिसरात नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी राष्ट्रपती कोविंद देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचले. राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.
देवाचे दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसराच्या व्यासपीठावर शुभारंभ सोहळा पार पडला. हे मंदिर तिरुमला मॉडेलमध्ये बांधण्यात आले असून येत्या 48 दिवसांत मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. 1 ऑगस्टनंतर हे मंदिर लोकांसाठी खुले केले जाईल, अशी माहिती इस्कॉन बंगळुरचे अध्यक्ष मधु पंडित दास यांनी दिली.
देशाच्या विविध भागांतील भाविकांसाठी हे भक्तीचे क्षेत्र असेल. येथे नेहमी मोफत जेवणाची व्यवस्था असेल.

About Belgaum Varta

Check Also

जातनिहाय जनगणती अहवाल : निर्णय न होताच मंत्रिमंडळ बैठकीची सांगता

Spread the love  लेखी अभिप्राय देण्याची सूचना; अहवालावर मंत्र्यांमध्ये मतभेद बंगळूर : जात जनगणना अहवाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *