बेळगाव : स्टेट कंझ्युमर फोरम कलबुर्गी येथे हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्याला विरोध करत येथील वकिलांनी मंगळवार दि. 14 जूनला कामावर बहिष्कार घालून तीव्र आंदोलन छेडले. दरम्यान आज बुधवार दि. 15 जून रोजीही हे आंदोलन सुरू आहे.
बेळगावमध्ये स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करण्यासाठी सरकारने मान्यता दिली होती. हा कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र अचानक येथील स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम कलबुर्गीला हलविण्यात आले आहे. त्यामुळे त्याविरोधात वकिलांनी कामावर बहिष्कार घालून काल मंगळवार दि. 14 जून रोजी तीव्र आंदोलन छेडले होते. तातडीने हा निर्णय सरकारने बदलावा यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. याचबरोबर लवकरात लवकर बेळगावात कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता.
आज पुन्हा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालताना बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली समस्त वकीलवर्गाने राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे मोठ्या संख्येने जमा होऊन जोरदार निदर्शने केली.
यावेळी बेळगावात कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करावे या मागणीसह मंत्री उमेश कत्ती यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी संतप्त वकिलांनी चन्नम्मा सर्कल येथे रास्ता रोको आंदोलनही केले. बराच काळ चाललेल्या या रास्ता रोकोमुळे चन्नम्मा चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. वकिलांच्या या आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, स्वत: पेशाने वकील असलेले बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी आंदोलनकर्त्या वकिलांची भेट घेतली. तसेच मंत्री उमेश कत्ती यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आंदोलन करणार्या वकिलांच्या नेते मंडळींसोबत बोलणे करून दिले. त्यावेळी मंत्री उमेश कत्ती यांनी आश्वासन दिले असले तरी वकिलांनी चन्नम्मा सर्कल येथील आपले आंदोलन दुपार झाली तरी सुरू ठेवले होते.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यत्नट्टी, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. सचिन शिवन्नावर, सरचिटणीस अॅड. गिरीराज पाटील व संयुक्त सचिव अॅड. बंटी कपाही यांच्या नेतृत्वाखाली आज छेडण्यात आलेल्या आंदोलनात अॅड. महांतेश पाटील, अॅड. अभिषेक उदोशी, अॅड. आदर्श पाटील, अॅड. इरफान ब्याल, अॅड. प्रभाकर पवार, अॅड. पुजा पाटील, अॅड. मारुती कामाण्णाचे शेकडो वकील सहभागी झाले होते.
