Sunday , July 21 2024
Breaking News

प्रदेश कॉंग्रेसतर्फे जोरदार ‘राजभवन चलो’ आंदोलन

Spread the love

नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

बंगळूर : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची राजकीय सूड भावनेतून ईडीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप करून प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे राजभवन चलो आंदोलन हाती घेण्यात आले होते. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन रोखले.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणासंबंधी कॉंग्रेस नेते राहून गांधी यांची ईडीमार्फत सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. उद्याही चौकशीसाठी हजर रहाण्यासंदर्भात त्याना नोटीस देण्यात आली. त्यामुळे केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राजकीय सूडाचे राजकारण सुरू केल्याचा आरोप करून प्रदेश कॉंग्रेस कार्यालयापासून ‘राजभवन चलो’ मोर्चाला सुरवात करण्यात आली. मोर्च्याला पोलिसांनी वाटेतच रोखले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या चौकशीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते बी.के. हरिप्रसाद आणि काँग्रेस आमदार व हजारो पक्ष कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
बंगळुरमधील बाळेकुंद्री सर्कलजवळ पोलिसांनी त्यांना अडवले. त्याबरोबर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह नेते व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटकेस विरोध करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी अक्षरश: उचलून नेले.
सिद्धरामय्या म्हणाले की, सुब्रमण्यम स्वामींनी दिलेल्या तक्रारीवरून आमच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आपण सर्व आपल्या नेत्यांच्या मागे उभे आहोत. चौकशी करायला हरकत नाही. पण हेतू आपल्या नेत्यांना बदनाम करण्याचा दिसतो. त्यांनी दिल्ली काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेतले आहे. भाजपविरोधातील शक्तींनी एकत्र आले पाहिजे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि कम्युनिस्ट नेत्यांनी या विषयावर बोलले पाहिजे, असे सिद्धरामय्या म्हणाले.
काँग्रेसने काश्मीर ते कन्याकुमारी या ‘भारत जोडो’ पदयात्रेची घोषणा केल्यानंतर केंद्रातील सरकार काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले राहूल गांधी यांच्याविरुध्द खोटे प्रकरण नोंद करण्यात आले आहे. राहूल गांधी यांनी आपली मिळकत जनतेला देऊन त्याग केला आहे. नॅशनल हेरॉल्ड ही त्यांची मिळकत नाही, ती कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मिळकत आहे. त्यांनी स्वताच्या उपयोगासाठी वापरलेली नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणत्याग केला आहे. सोनिया राहूल यांनी अधिकाराचा त्याग केला. त्यांना केंद्र सरकार जाणीवपुर्क त्रास देत आहे. त्याला विरोध करण्यासाठी करण्यासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
गांधी कुटूंबियांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला आहे. तो विसरता यणार नसल्याचे शिवकुमार म्हणाले. उद्यापासून जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.
आंदोलनात भाग घेतलेल्या विरोधी पक्ष नेते सिध्दरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, जी. परमेश्वर, रिझवान हर्षद, के. जी. जॉर्ज, परमेश्वर नायक आदीना पोलिसांनी अटक केली.

About Belgaum Varta

Check Also

धोतर नेसलेल्या वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; बंगळुरूमधील घटना

Spread the love  बंगळुरू : धोतर नेसलेल्या एका वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना कर्नाटकची राजधानी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *