बेळगाव: गुरुजी डॉ.चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
हे दोघेही चंद्रशेखर गुरुजी यांच्याकडे काम करत होते. गुरुजींनी वनजाक्षी आणि मंजुनाथ यांचा स्वतः पुढाकार घेवून विवाह केला होता. नंतर त्यांना प्लॉटदेखील दिला होता. 2019 पर्यंत हे गुरूजींच्याकडे काम करत होते. नंतर त्यांनी काम सोडले. काम सोडल्यावर गुरुजींनी त्यांच्याकडे प्लॉट परत करण्याचा तगादा लावला होता.
गुरुजींची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून शोध सुरू केला होता. एसीपी विनोद यांच्या पथकाने मारेकऱ्यांना रामदुर्ग येथे ताब्यात घेतले आहे.
चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये झालेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.