मुख्यमंत्री बोम्माई : दसर्यानंतरच प्राथमिक शाळांबाबत निर्णय
बंगळूरू : महाराष्ट्र आणि केरळ राज्यासह सीमावर्ती जिल्ह्यात लादण्यात आलेले कोविड निर्बंध दसरा सणानंतर शिथिल करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी सांगितले. प्राथमिक शाळा सुर करण्याबाबतही त्याचवेळी निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र, केरळ आणि राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कोविड परिस्थितीचे तज्ञ मूल्यांकन करत आहेत. दसरा सणानंतर लवकरच, कोविड तज्ञांची बैठक बोलावली जाईल आणि सीमेवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येईल. याच बैठकीत पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळांत ऑफलाईन वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 2-18 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर सरकार त्यांना लसीकरण सुरू करेल.
जामीनावर सुटका झाल्यानंतर ’मॉरल पोलिसिंग’ घटनेतील दोन आरोपींना भाजपचे आमदार उमानाथ कोटियन यांनी पोलीस ठाण्यापासून एस्कॉर्ट केल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया मागितली असता, मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर देण्यास नकार दिला आणि ते म्हणाले, जेव्हा नैतिकता नसते तेव्हा कारवाई आणि प्रतिक्रिया नक्कीच घडेल.
ही एक संवेदनशील बाब आहे. समाजात अनेक भावना आहेत. अशा भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने वागण्याची गरज आहे. जर अशा भावना दुखावल्या गेल्या तर कृती आणि प्रतिक्रिया घडणे बंधनकारक आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच सांप्रदायिक सौहार्द राखणे ही देखील सरकारची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ते करण्यात सहकार्य केले पाहिजे. तरुणांनी समाजाच्या भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने वागले पाहिजे. हा एक सामाजिक प्रश्न आहे. नैतिकता असली पाहिजे. आम्ही नैतिकतेशिवाय जगू शकत नाही, असे ते म्हणाले.
