बंगळूरू : कर्नाटक सरकारने बुधवारी (ता. 27) आपल्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्त्यात (डीए) वाढ करून दीपावलीची भेट दिली आहे. सरकारी कर्मचार्यांचा डीए आता त्यांच्या मूळ वेतनाच्या 21.5 टक्क्यांवरून 24.5 टक्के करण्यात आला आहे. तीन टक्के डीए वाढविल्याचे वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
1 जुलैपासून महागाई भत्ता वाढ पूर्वलक्षीपणे लागू होणार आहे. पेन्शनधारकांनाही या दरवाढीचा फायदा होणार आहे.
आदेशानुसार, पूर्णवेळ सरकारी कर्मचारी, जिल्हा पंचायतींचे कर्मचारी, नियमित वेतनश्रेणीवर काम करणार्या कर्मचार्यांना, अनुदानित शैक्षणिक संस्थांचे पूर्णवेळ कर्मचारी आणि नियमित टाइम स्केलवर असणार्या विद्यापीठांना महागाई भत्ता वाढ लागू होईल.
हा आदेश युजीसी/एआयसीटीई/एसीएआर वेतनमानावरील वर्तमान आणि माजी कर्मचार्यांनाही लागू आहे, असे वित्त विभागाने म्हटले आहे. या वाढीमुळे साडेचार लाख पेन्शनधारकांव्यतिरिक्त सहा लाख कर्मचार्यांना फायदा होणार आहे.
मागील बी. एस. येडियुराप्पा सरकारने कर्मचार्यांसाठी डीए 10.25 टक्क्यांनी वाढवल्यानंतर काही महिन्यांनंतर हा नवीन आदेश आला आहे.
