बेंगळुरू : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात कपात केली असून आज रात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी रात्री पेट्रोल दरात ५ आणि डिझेल दरात १० रुपयांची कपात केली आहे. सदर निर्णय रात्री उशिरा जाहीर झाल्यामुळे यासंदर्भात अर्थमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर इतर राज्यांच्या निर्णयाचा विचार करून कर्नाटकात देखील पेट्रोल आणि डिझेल दरात ७ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यानंतर देशातील डॅश बोर्ड प्रणालीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रशासकीय सुधारणांसाठी सीएम डॅशबोर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विभागातील प्रमुख प्रकल्प या डॅशबोर्डवर नमूद करण्यात येणार असून यासंदर्भात आमचे अधिकारी आणि आपण स्वतः दररोज याचा अभ्यास करून यावर काम सुरु करणार आहोत. सदर प्रणाली सुरु करणारे आपले राज्य पहिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर व्हॅक्सिनेशन संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात लसीकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बंगळुरू महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जनतेच्या घरी जाऊन लसीकरणाची नोंदणी करण्यात येणार असून त्याचठिकाणी जनतेला पोचपावती देखील देण्यात येणार आहे असे ते म्हणाले. आतापर्यंत बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रशासकीय सुधारणांमध्ये अनेक बदल केल्याचे निदर्शनास आले असून आगामी काळात कोणत्या नव्या योजनांचा कर्नाटकातील जनतेला लाभ होईल, हे पाहावे लागेल.
