बंगळूर : कर्नाटकातील दहावीची (एसएसएलसी) परीक्षेला या शैक्षणिक वर्षातही उशीर होण्याची शक्यता आहे. सलग तिसर्या वर्षी दहावीच्या वार्षिक परीक्षांना उशीर होत आहे. शाळा उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यासाठी शिक्षक संघटनेने 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची सूचना केली आहे. परंतु परीक्षा उशीरा घेण्याचा माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ विचार करीत असल्याचे, एका अधिकार्याने स्पष्ट केले.
महामारीपूर्व काळात, शिक्षक डिसेंबरच्या अखेरीस अभ्यासक्रम पूर्ण करायचे आणि पुढचे दोन महिने उजळणी आणि पूर्वतयारी परीक्षांसाठी समर्पित करायचे. यंदा, शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, ते मार्चपर्यंतच अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी उजळणीसाठी किमान एक महिना आवश्यक आहे.
कर्नाटक हायस्कूल असिस्टंट मास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष एच. के. मंजुनाथ यांनी विभागाला अभ्यासक्रम कमी करण्याबाबत विचार करण्याची विनंती केली. आम्ही मंत्र्यांना निवेदनही दिले आहे. केवळ या शैक्षणिक वर्षासाठी 20 टक्के अभ्यासक्रम कमी केल्यास, किमान पुढील शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक उपक्रम मार्गी लागण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
यंदा परीक्षा आणि निकाल जाहीर होण्यास उशीर झाला, तर पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर होईल. त्याऐवजी, विभागाने यावर्षी 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार केला पाहिजे जेणेकरून आम्ही वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करू शकू आणि परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार आयोजित केल्या जाऊ शकतात, अशी त्यांनी सूचना केली.
