निपाणीत वाहतूक कोंडी कायम : वाहनधारकासह प्रवाशांतून संताप
निपाणी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करता कोरोणाचे नियम पाळून साधेपणाने उरूस साजरा करण्याचे निर्देश दिल्यामुळे अनेक भक्तांच्या उत्साहावर पाणी फिरले होते. पण निपाणी करांसाठी उरुसाचे महत्त्व अनन्यसाधारण असून कदूरची बकरी, दंडवत व मलीदा नैवद्य अनेक हिंदू कुटुंबात असल्यामुळे थोड्या प्रमाणात गर्दी ही होणारच होती. त्यातच आठवडी बाजार असल्यामुळे निपाणीतील छत्रपती संभाजीराजे चौकापासून चारी बाजूस रस्त्याच्या मधोमध असलेले दुकानाचे बोर्ड, हातगाडी वाले व अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांच्या रांगेमुळे परत एकदा निपाणीमध्ये वाहतूक कोंडी होऊन कित्येक वेळ ट्रॅफिक जाम होऊन सर्वांचे अतोनात हाल झाले. पण या काळात ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा आणि पोलिस नसल्याने वाहनधारकांच्या प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीराजे चौकामध्ये भीषण अपघात होऊन एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर लागलीच प्रशासनाने अवजड वाहनास बंदी करण्यासाठी राजे मोबाईलपासून मेट्रो कोल्ड्रिंक्सपर्यंत वरील बाजूस दहा फुटांवर लोखंडी पाईप बसवून प्रवेश निषिद्ध केला होता. त्यावेळी निपाणीमध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले होते. त्यावरुन देखील वाहतूक कोंडी समजू शकत होती. पण त्याचे पुढे काय झाले असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
सर्व वाहतूक कोंडीमध्ये साखर कारखान्याची ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रॅक बैलगाडी मोठ्या जोमात चालू असून वाहतूक करणार्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा सर्रास वावर निपाणीच्या बस स्टँड परिसरातून होत आहे. त्यामुळे सदरच्या ट्रॅक्टरना रेडियम व कापडी रिफ्लेक्टर लावून नंबर प्लेट असलेल्याच ट्रॉली कारखान्याकडे मार्गस्थ करण्याचे देखील पोलीस प्रशासनाने नियम करावेत, अशी देखील मागणी जनतेतून होत आहे.
निपाणीतील प्रत्येक रस्त्यातील वाहतूक कोंडी नित्याची झाली असून प्रत्येक ठिकाणी दुकानाचे सायनिंग बोर्ड, सविस्तर लावलेली दुकाना समोरील वाहने, हातगाडी फेरीवाले, यांच्यामुळे होणारा नाहक त्रास कमी करायचा असेल तर वाहतूक कोंडीचे कायमचे निराकरण करावे. सर्व रस्ते मोकळा श्वास घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसून कठोर नियम करून कायमची वाहतूक कोंडी दूर करण्याचे शिवधनुष्य प्रशासनाने उचलावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
Check Also
ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या समस्यांबबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा
Spread the love निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी …