
बारामती : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आता गॅस सिलेंडरही 29 रुपयांनी महागल्याने महागाईचा आणखी एक फटका जनतेला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
बारामती दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “दरवाढीचे हे सत्र सातत्याने सुरू असून त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या संसारावर होत आहे. महागाई नियंत्रणात असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात टप्प्याटप्प्याने जनतेवर आर्थिक भार टाकला जात आहे. या निर्णयांची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी मोजावी लागेल.”
देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार दिल्लीमध्ये 14.2 किलोचा सिलेंडर 942 रुपयांना, मुंबईत 941.40 रुपयांना, कोलकाता येथे 968 रुपयांना, चेन्नईमध्ये 957 रुपयांना तर बेंगळुरूमध्ये 944.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढलेला खर्च यामुळे घरगुती गॅस विक्रीत नुकसान होत असल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजीही सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत एलपीजी सिलेंडर जवळपास 90 रुपयांनी महागला असून सर्वसामान्य कुटुंबांच्या घरगुती अर्थसंकल्पावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईविरोधात विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून गॅस दरवाढीच्या निर्णयाविरोधात विविध स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta