
बेळगाव : बहुकोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या भाग्यनगर येथील कार्यालयाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि वृत्तांकनासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडून अडविण्यात आल्याचा तसेच गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीविरोधातील कारवाई आणि कार्यालयातील घडामोडींची माहिती संकलित करण्यासाठी विविध माध्यमांचे प्रतिनिधी कार्यालय परिसरात उपस्थित होते. यावेळी काही महिला कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्यास व चित्रीकरण करण्यास विरोध केल्याचे सांगितले जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकारांशी वाद घातल्याची माहितीही समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही कर्मचारी एकत्र येऊन माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच अपमानास्पद शब्दांचा वापर करून पत्रकारांना परिसरातून निघून जाण्यास सांगितल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
याचदरम्यान काही पुरुष कर्मचाऱ्यांनीही माध्यम प्रतिनिधींशी शाब्दिक चकमक केल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे मालक बलराज माने यांच्या समर्थनार्थ काही कर्मचारी उघडपणे भूमिका घेत असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले. माहिती बाहेर जाऊ नये यासाठी पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माध्यम प्रतिनिधींनी केला आहे.
दरम्यान, आदित्यराज कॅपिटलविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी झालेल्या कथित गैरवर्तनामुळे पत्रकार संघटनांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पत्रकारांना माहिती संकलन व वृत्तांकन करण्याचा घटनात्मक अधिकार असून, त्यांच्याशी अरेरावी अथवा धक्काबुक्की होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
घटनेनंतर पत्रकारांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्रकारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आदित्यराज कॅपिटलच्या चार महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta