Sunday , September 20 2026
Breaking News

आदित्यराज संस्थापकावर लूकआऊट नोटीस; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

 

बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रकरणात तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला असून कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बलराज माने यांच्यासह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माने यांनी देश सोडू नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, आदित्यराज कॅपिटलने आरबीआय आणि सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ठेवी स्वीकारल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. कंपनीने ‘लेव्हरेज फंडिंग ॲग्रीमेंट’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दरमहा पाच टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. मात्र, अशा प्रकारच्या व्यवहारांना सहकार कायदा, आरबीआय किंवा सेबीच्या कोणत्याही नियमांमध्ये मान्यता नसल्याचे तपासात आढळून आले आहे.

१ जून रोजी कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला असून त्यामध्ये कंपनीचे अनेक आक्षेपार्ह व्यवहार उघडकीस आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

तपासादरम्यान सुमारे सात हजार गुंतवणूकदारांनी कंपनीत पैसे गुंतवल्याचे समोर आले असून एकूण व्यवहाराची रक्कम ५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हा तपास सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, कंपनीची वेबसाईट आणि संगणकीय माहिती फॉरमॅट करण्यात आल्यामुळे तपासात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, तपास पथकाने मोठ्या प्रमाणावर माहिती आणि पुरावे संकलित केले आहेत.

बलराज माने यांचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाला असून त्यांच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. ते देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांपैकी कोणीही तपासात अपेक्षित सहकार्य करत नसल्याची माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली.

दरम्यान, आदित्यराज कॅपिटल प्रकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या आर्थिक गैरव्यवहाराच्या संपूर्ण चौकशीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *