Sunday , September 20 2026
Breaking News

येळ्ळूर गावातील विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष द्यावे; येळ्ळूर ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर गावातील विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, येळ्ळूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन सादर केले. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीकडे अनेक नागरिकांनी ई-सत्तु (संगणक उतारे) मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, मात्र अद्याप कोणालाही उतारे मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कर्ज प्रकरण, मालमत्ता हस्तांतरण तसेच विविध शासकीय कामांसाठी हा उतारा आवश्यक असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय गावातील सरकारी स्मशानभूमीत वीज, पाणी व स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडेझुडपे वाढल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून काही भागांमध्ये जलजीवन मिशनची जोडणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही गावातील गटारी साफसफाई झालेली नाही. काही ठिकाणी केवळ देखावू स्वरूपाची कामे करून संपूर्ण गावातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरण्यासाठी दंडाची तरतूद केली जाते, मात्र नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावातील ई-सत्तु उतारे (संगणक उतारे), पाणीपुरवठा, स्मशानभूमी सुविधा, गटार सफाई आणि अन्य नागरिक समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि घरपट्टी व पाणीपट्टी करांवर बहिष्कार घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. यावेळी सदस्य शिवाजी नांदूरकर, परशराम परीट, निखिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *