

बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी मध्यरात्री मोठी दरड कोसळून प्रचंड शिळा रस्त्यावर आल्याने बेळगाव–सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानक दरड कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर पडले. त्यामुळे मध्यरात्री काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिस, अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड हटविण्याचे काम सुरू केले. बहुतांश शिळा हटविण्यात आल्या असल्या तरी काही ठिकाणी काम अद्याप सुरू आहे.
सध्या पोलिसांनी एकेरी मार्गाने वाहतुकीला परवानगी दिली असून, अंबोली घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावरील दगड तात्काळ बाजूला करण्याचे आणि घाटमार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते आणि पथक घटनास्थळी रवाना झाले असून, दगड हटवण्यासाठी जेसीबी पाचारण करण्यात आला आहे. लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta