Friday , October 23 2026
Breaking News

महिला सन्मानाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे मौन का?

Spread the love

 

खासदार अंगोमचा बिमोल अकोइजम प्रकरणी काँग्रेस नेतृत्वाला डॉ. सोनाली सरनोबत यांचा सवाल

बेळगाव : महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवणाऱ्या काँग्रेसने स्वतःच्या खासदाराशी संबंधित गंभीर प्रकरणावर स्पष्ट भूमिका का मांडलेली नाही, असा सवाल भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे लोकसभा खासदार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्यावरील विद्यापीठाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला धारेवर धरले.

डॉ. सरनोबत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ मध्ये ११ विद्यार्थिनींनी या प्रकरणी विद्यापीठाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची विद्यापीठाच्या अंतर्गत समितीने महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासंदर्भातील (POSH) कायद्याच्या चौकटीत चौकशी केली. त्यानंतर समितीच्या शिफारशीनुसार ९ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यापीठाने संबंधित खासदाराविरुद्ध बडतर्फीची कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणातील आरोप गंभीर असून, तक्रारदार विद्यार्थिनींना न्याय मिळणे, चौकशी निष्पक्षपणे होणे आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसने या प्रकरणातही आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी डॉ. सरनोबत यांनी केली. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावर जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे. तसेच संबंधित खासदाराबाबत पक्षांतर्गत कोणती भूमिका घेतली जाणार, हेही स्पष्ट करावे, असे त्यांनी म्हटले.

‘लडकी हूँ, लड़ सकती हूँ’ अशी घोषणा देणाऱ्या काँग्रेसने महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नावर राजकीय सोय न पाहता ठाम भूमिका घ्यावी. महिला कोणत्याही पक्षाची असो किंवा कोणत्याही सामाजिक स्तरातील असो, तिच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण झालेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवणे ही केवळ राजकीय घोषणा नसून प्रत्येक पक्षाची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. कोणतेही राजकीय पद कायद्यापेक्षा मोठे नाही आणि कोणताही राजकीय पक्ष महिलांच्या सन्मानापेक्षा मोठा नाही. त्यामुळे काँग्रेसने या प्रकरणावर मौन न बाळगता पारदर्शक भूमिका मांडावी, असे आवाहन डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

न्यू वृंदावन कॉलनीत १ कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

Spread the love  बेळगाव : शिवतीर्थ कॉलनीतील न्यू वृंदावन कॉलनी येथे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *