


बेळगाव : नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बेळगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, न्यू उदय भवन, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालन व स्वागतगीताने श्री. किशोर काकडे यांनी केली. त्यानंतर संस्थेच्या सर्व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीमती दीपा प्रभुदेसाई यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस वाचून दाखवली.
श्री. भारत राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी अध्यक्षीय भाषणातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला तसेच सदस्यांचा सहभाग, संस्थेच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न आणि आगामी उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
सभेत संस्थेचा ताळेबंद (Balance Sheet) श्री. भूषण रेवणकर यांनी सादर केला. नफा-तोटा पत्रक श्रीमती अनुषा जोशी यांनी मांडले. तसेच आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प श्री. प्रसाद घाडी यांनी सभेसमोर सादर केला.
यावेळी संचालक मंडळातील सदस्य तसेच सभासदांना आपले विचार, सूचना व अभिप्राय मांडण्याची संधी देण्यात आली. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसह सभासदांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी श्रीमती सुनीता पवार यांनी आभार प्रदर्शन केले. सभेनंतर उपस्थित सभासदांसाठी अल्पोपहार व चहा-कॉफीची व्यवस्था करण्यात आली होती.
संचालक मंडळ व सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Belgaum Varta Belgaum Varta