


बेळगाव : आनंदनगर पहिला क्रॉस येथील शिवमंदिरात उत्कर्ष महिला मंडळातर्फे शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) दुर्गापूजनाचा कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. दुर्गादेवीच्या पूजनाने मंदिर परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. देवीचा जयघोष, आरती आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील आणि उपाध्यक्षा चंदा घाडी यांच्या हस्ते दुर्गादेवीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या सचिव शिवाणी पाटील यांच्या हस्ते शिवपिंडीचे, तर शुभांगी पाटील यांच्या हस्ते नंदीचे पूजन करण्यात आले. धार्मिक विधींनंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष सौ.शुभांगी पाटील यांनी देवीच्या नऊ रूपांचे महत्व आणि स्त्रीमध्ये असलेले देवीचे सुप्त गुण याबद्दल माहिती सांगितली यानंतर सौ. धनश्री बर्गे यांच्या भक्तिमय भजनसेवेने कार्यक्रमाची सांगता झाली.
धार्मिक परंपरा जपत महिलांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून भक्तीभाव आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडले. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी हेमलता कानशिडे, सुनीता पाटील, विमल साळी, स्मिता वेसणे, मंगल पाटील, शारदा मुरकुटे, वनिता पाटील, सीमा जुवेकर, सुमन कांदेकर, सुचेता पेंडसे, प्रेमा तमुचे, दीपा सुतार यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta