


दोन दिवस चुरशीच्या स्पर्धा ; नामांकित संघांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : दोन दिवशी रंगलेल्या चुरशीच्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्थ बेंगळुरू येथील मुला मुलींच्या संघाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. तर मंड्या आणि साउथ बेंगळुरू संघांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील नामांकित संघांनी भाग घेतला होता.
शालेय शिक्षण विभाग (पदवीपूर्व) बेंगळुरू, उपसंचालक शालेय शिक्षण विभाग (पदवीपूर्व) शैक्षणिक जिल्हा चिकोडी, पदवीपूर्व महाविद्यालयीन प्राचार्य आणि व्याख्याता संघ, बोधकेतर कर्मचारी संघ आणि शारीरिक शिक्षण व्याख्याता संघ, शैक्षणिक जिल्हा चिकोडी तसेच के.एल.ई. संस्थेचे जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समारोप समारंभात मुख्य अतिथी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे चिक्कोडी येथील आर. डी. महाविद्यालय प्राचार्य उत्तम शिंदे त्यांनी, ‘क्रीडा क्षेत्रात जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे उपविजेत्या संघांनीखचून न जाता पुढच्या स्पर्धेच्या तयारीला लागावे. आजची जिद्द उद्या नक्कीच विजेतेपद मिळवून देईल, असे सांगितले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एम. हुरळी, पदवीपूर्व प्राचार्या एच. डी. चिक्कमठ, चिकोडी क्रीडा संघाचे अध्यक्ष जी. एम. चनगोंडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गीता कमते यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta