


महांतेश कोठीवाले; महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात बैठक
निपाणी (वार्ता) : विविध संघटनेच्या जागेसाठी येथील नगरपालिकेलाअर्ज केले होते. त्यानुसार आमदार शशिकला जोल्ले, तत्कालीन नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांच्या हस्ते जागा मंजुरी पत्राचे वितरण केले होते. मात्र सध्या नागरिकांनी ही जागा उद्यानाची मागणी केली आहे. व्यापारी, शेतकरी समन्वय यांकरिता चर्चा करण्यासाठी, कार्यालयाकरिता जागा पाहिजे म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार आम्हाला जागा देण्यात आली आहे. पण त्यास होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकजुटीने लढा देणे गरजेचे आहे. याबाबत कायदेशीर मार्गाने लढा देण्यात येणार आहे. प्रशासनाकडे आयुक्त, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे आणि राजकीय दृष्ट्या आमदार, खासदार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे चिक्कोडी तालुका तंबाखू व्यापारी फेडरेशनचे उपाध्यक्ष महांतेश कोठीवाले यांनी सांगितले.
चिक्कोडी तालुका तंबाखू व्यापारी फेडरेशन, डॉ. वैशाली, डॉ. विलास पारेख, महावीर आरोग्य सेवा संघ मास्क ग्रुप आणि निपाणी सराफ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सतिश वखारिया यांनी स्वागत केले. महावीर सेवार्थ संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शहा म्हणाले, ठराव क्र . २२९/२०२५ रि.स. क्रं.१६१/६२ मध्ये जागा मंजूर करण्यात आली आहे. तात्काळ हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा केला. सदर सर्व्हे मध्ये खुली जागा सोडण्यात आली होती. त्यानुसार आम्हाला जागा मिळाली आहे. या जागेचा समाजासाठी सदुपयोग होणार आहे. तिन्ही संघटनेची चांगली इमारत निर्माण होईल. यासाठी सर्व संघटनांनी एकजुटीने लढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल पोतदार म्हणाले, सराफ संघटना १०० वर्षांपासून असून आजपर्यंत जागेसाठी प्रयत्न केले होते. मात्र, सोनल कोठडिया यांनी आपणाला बोलावून जागा उपलब्ध करून दिली आहे. संघटनेला या जागेची गरज असल्याचे सांगितले.
बैठकीस धनंजय मानवी, विलास माळी, बसवराज जडी, सुरेश शेट्टी, मोहन शहा, सुरज राठोड, राजू मेहता, सुरेश शेट्टी,
अक्षय पुरंत, दीपक वखारिया, राजेंद्र पोतदार, सतीश वखारिया, राजू मेहता, प्रतीक शहा, बाबुराव खडेद, मिलिंद मेहता, राजेश कोठडिया यांच्यासह तिन्ही संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta