


तंजावर : ऐतिहासिक तंजावर नगरीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष तथा सीमाकवी रवींद्र पाटील यांचा छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
संमेलनाचे उद्घाटन छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण तसेच विशेष अतिथी आप्पासाहेब गुरव यांचाही सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची भूमिका प्रभावीपणे मांडली. बेळगाव सीमाभागातील मराठी साहित्यिक परंपरा आणि तंजावरच्या मराठी सांस्कृतिक वारशातील ऐतिहासिक व सांस्कृतिक अनुबंध अधोरेखित करत, साहित्याच्या माध्यमातून विविध मराठी सांस्कृतिक प्रवाहांमध्ये संवाद अधिक व्यापक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी युवराज आबाजीराजे भोसले, संमेलनाचे निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले, संमेलनाध्यक्ष डॉ. शरद गोरे, स्वागताध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच आप्पासाहेब गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
बेळगावच्या कवींनी रंगविले काव्यसंमेलन
संमेलनातील काव्यसत्रात बेळगावच्या कवींनी केलेल्या प्रभावी काव्यसादरीकरणाने तंजावरच्या साहित्यरसिकांची मने जिंकली. रामदास बिर्जे, व्यंकाप्पा पाटील आणि विलास बेळगावकर यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
काव्याच्या माध्यमातून बेळगावच्या साहित्यपरंपरेचा परिचय तंजावरच्या रसिकांना झाला. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या भाषणातून आणि साहित्यिक योगदानातून सीमाभागातील मराठीचा स्वर तंजावरच्या साहित्यविश्वापर्यंत पोहोचला.
या साहित्यिक सहभागामुळे बेळगाव आणि तंजावर यांच्यातील मराठी भाषिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण संवाद घडून आला.

Belgaum Varta Belgaum Varta