


निपाणीत रयत संघटनेची बैठक
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या हक्कांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवास स्थानासमोर मंगळवारी (ता. २९) आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.२९) सकाळी ९ वाजता कोगनोळी टोल नाका आणि महामार्गावरील हत्तर्गी मुक्ती मठाजवळ सर्वांनी एकत्र यावे. या आंदोलनात कारखानदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करणे, या हंगामासाठी ऊस पिकाला किमान ५५०० रुपये प्रति टन दर देऊन कारखाना सुरू करावेत, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना शास्त्रीय आणि योग्य भाव द्यावे, २०१९ पासून साखरेचा किमान आधारभूत किंमत ३१ रुपये होती, परंतु २०१९ ते २०२६ या काळात ऊस लागवडीवरील खर्च ३ पटीने वाढला आहे आणि सीएसीपी खर्चच्या अहवालाच्या आधारे किमान आधारभूत किंमत ६० रुपये निश्चित केली जावी. साखरेची किंमत घरगुती वापरासाठी ५० रुपये आणि व्यावसायिक वापरासाठी १०० रुपये निश्चित करावी.
कर्नाटकात इथेनॉलच्या उत्पादन आणि विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी, सर्व कृषी उपक्रम व्हीबी प्रकल्पांतर्गत राबवले जावेत. साखरेच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे, २०२५-२०२६ या वर्षासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त ३०० रुपये देण्यात यावी. कर्नाटकचा महादयी सिंचन प्रकल्प सर्व विभागांकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीही राजू पोवार यांनी केली.
सुनील पाटील, बबन जामदार, मधुकर पाटील, कालगोंडा कोटगे, बाबासाहेब पाटील, सर्जेराव हेगडे, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, संजय पोवार, सूर्याजी पोटले, किसन पपोटले, सागर पाटील, नितीन कानडे, चिनू, कळमोडे, संजय जोमा, विजय चौगुले, एकनाथ सादकर, आनंद गायकवाड, सुभाष चौगुले, राजु उपाध्ये, अक्षय चौगुले, नामदेव साळुंखे, अमित चौगुले, सिद्धू मिरजे, सचिन कांबळे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta