


बेळगाव : बेळगावमध्ये यंदाचा गणेशोत्सव उत्साह, भक्तिभाव आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. तब्बल ४२ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांनी उपस्थिती लावत भक्तिमय वातावरण अनुभवले.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विशेषतः कपिलेश्वर तलाव परिसरात विसर्जन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. चव्हाट गल्ली सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या आराध्य ‘बेळगावच्या राजा’च्या अंतिम दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
दिवसरात्र सुरू असलेल्या मिरवणुकीत गणेशमूर्तींची पूजा व आरती करून भाविकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. मोठ्या आकाराच्या मूर्ती आणि मिरवणुकीतील प्रचंड जनसमुदायामुळे विसर्जन प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला.
दरम्यान, पुढील वर्षांमध्ये गणेशमूर्तींची उंची आणि मिरवणुकीचा कालावधी नियंत्रित करण्यासाठी अधिक नियम लागू करण्याबाबत पोलिस विभागाकडून संकेत देण्यात आले आहेत.
लाखो भाविकांच्या सहभागामुळे शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र बंदोबस्त बजावला. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पोलीस आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
अखेर बेळगाव महापालिकेच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर यंदाच्या भव्य गणेशोत्सवाची सांगता झाली. भक्ती, उत्साह, शिस्त आणि जनसहभागाचे दर्शन घडविणारा बेळगावचा गणेशोत्सव यंदाही एक अविस्मरणीय अध्याय ठरला.

Belgaum Varta Belgaum Varta