


इको फ्रेंडली मूर्ती, पीओपी मूर्ती व गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
बेळगाव : श्री गणेश ही विद्येची, ज्ञानाची आणि बुद्धीची देवता आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणरायाची पूजा करताना त्याच्यातील गुण आपल्या अंगी बाणवावेत, हीच या उत्सवामागील खरी भावना आहे, असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे प्रबोधनकार शंकरराव बांदकर यांनी केले.
श्री साई मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघाच्या वतीने आयोजित ‘श्री साई गणेश सृजन महोत्सवा’ अंतर्गत घरगुती इको फ्रेंडली गणेशमूर्ती, उत्कृष्ट गणेश सजावट आणि उत्कृष्ट पीओपी गणेशमूर्ती अशा तीन विभागांत बेळगाव दक्षिण व उत्तर भागांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्यांना शुक्रवारी सायंकाळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विश्वकर्मा संस्थेच्या श्यामप्रसाद मुखर्जी रोडवरील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक आनंद चव्हाण, पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड आणि प्रबोधनकार शंकरराव बांदकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेच्या सीईओ आरती पोरवाल यांनी स्वागत केले. चेअरमन रोहित पोरवाल यांनी पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देशही आरती पोरवाल यांनी स्पष्ट केला.
कौशल्य, कल्पकता आणि बुद्धीचा योग्य वापर करून स्पर्धकांनी सुंदर गणेशमूर्ती घडविल्या आणि आकर्षक सजावट केली आहे. त्यांच्यातील या कलागुणांचा गौरव करण्यासाठीच पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. बुद्धीच्या जोरावर मनातील इच्छा पूर्ण करता येतात, असे बांदकर यांनी सांगितले.
आनंद चव्हाण म्हणाले, मुंबई आणि पुण्यानंतर बेळगावचा गणेशोत्सव ऐतिहासिक मानला जातो. शहरात साडेतीनशेहून अधिक गणेशोत्सव मंडळे उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. त्याचबरोबर घराघरांतही सुंदर गणेशमूर्ती आणि आकर्षक सजावट पाहायला मिळते.
स्पर्धेतील विजेते
इको फ्रेंडली गणेशमूर्ती दक्षिण विभाग
१. ऋत्विक घोडके, २. विठ्ठल गनगाणे, ३. प्रशांत काकतकर
उत्तर विभाग
१. प्रदीप पाटील, २. हेमंत हसबे, ३. रोहित कांबळे
पीओपी गणेशमूर्ती दक्षिण विभाग
१. मिलिंद शहापूरकर, २. राघवेंद्र दासपणावर, ३. प्रसाद भातकांडे
उत्तर विभाग
१. राकेश पोटे, २. महेश जाधव, ३. संपत निलजकर
उत्कृष्ट गणेश सजावट दक्षिण विभाग*
१. सोमनाथ कलखांबकर, २. श्रेयस भागानाचे, ३. अस्मिता तशिलदार
उत्तर विभाग
१. राहुल सागर, २. निलेश पाटील, ३. श्री पाटील
यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन दीपक कारेकर आणि सुरेश शेट्टी उपस्थित होते. परीक्षक सागर देसाई यांनी गणेशमूर्तींचे परीक्षण करतानाचे अनुभव सांगून स्पर्धकांना मार्गदर्शन केले. सीईओ आरती पोरवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अनेक गणेशभक्त, संस्थेचे संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta