Sunday , July 26 2026
Breaking News

बळ्ळारी नाल्यामुळे पुराचा धोका; जलपर्णी-कचऱ्यामुळे हजारो एकर शेती धोक्यात!

Spread the love

 

बेळगाव : बळ्ळारी नाल्याला यंदा मोठा पूर आल्यास नाल्यातील जलपर्णी, गाळ आणि शहरी भागातून वाहून आलेला कचरा थेट शेतजमिनीत शिरून हजारो एकर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

शहापूर, वडगाव, अनगोळ, माधवपूर, जुने बेळगाव, हालगा तसेच आसपासच्या शिवारातील शेतकरी दरवर्षी बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करत आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून केलेली खरीप पेरणी पुराच्या पाण्यात वाहून जाते, तर जमिनीत दीर्घकाळ ओलावा राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यात मिळणारी शासकीय नुकसानभरपाई अपुरी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असतानाही बायपास रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडत असून भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात दावे दाखल करण्यात आले असून सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, येळ्ळूर, धामणे, सुळगा, मच्छे आणि मजगाव परिसरातून येणारे पावसाचे पाणी बायपासच्या कामामुळे अडण्याची शक्यता असल्याने त्या भागातील शेतीही धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या शहरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी बळ्ळारी नाल्यात मिसळत असल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी, गाळ आणि कचरा साचला आहे. मोठा पूर आल्यास हा सर्व कचरा शेतजमिनीत पसरून सुपीक जमिनीचे मोठे नुकसान होईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात अनेक वेळा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांना निवेदने देऊन प्रत्यक्ष पाहणीची मागणी करण्यात आली. मात्र अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने नाल्याची स्वच्छता, जलपर्णी हटविणे आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *