

धनंजय पाटील यांचे खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला आवाहन
निवडणूक आयोगाने चालू केलेल्या एसआयआर (मतदार फेर निरीक्षण प्रक्रिया) अंतर्गत मतदारांची नावे नव्याने समाविष्ट करणे व बोगस किंवा मृत व्यक्तींची नावे वगळणे यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून पडताळणी सुरू आहे. राष्ट्रीय पक्षाच्या बूथ एजंटांना यापूर्वी यांचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, पण ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्राम पंचायती पासून आमदारकी पर्यंत लोकप्रतिधी होते त्यांना मात्र यातून अपक्ष म्हणून वगळण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना समितीच्या बूथ एजंटांना समाविष्ट करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. त्याच बरोबर निवडणूक आयोगाने सीमाभागात मराठी बहुभाषिक असून सुद्दा एसआयआर साठी लागणारे अर्ज हे इंग्रजी व कन्नड मध्ये वितरित केले आहेत, यासाठीही महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड व इंग्रजी बरोबरच मराठीतही अर्ज उपलब्ध करून द्यावेत यासाठी निवडणूक अधिकारी व संबंधित प्रशासनाकडेही पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
तरीही प्रशासनाने ही प्रक्रिया मराठीत अर्ज उपलब्ध न करता सुरू ठेवली आहे व याचा फायदा राष्ट्रीय पक्षाचे बूथ एजंट उचलत असून मराठी व समितीप्रेमी मतदारांचा टक्का कमी करण्याचा घाट निवडणूक प्रशासनाला पकडून त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी चालविला आहे.
यासाठी मराठी व समिती प्रेमी जनतेने सजग राहणे आवश्यक असून, आपल्या गावातील कोणी कन्या दुसरीकडे सासुरवाशीण किंवा दुसऱ्या गावातील कन्या आपल्या गावी सासुरवाशीण झालेली असेल किंवा गावात नव्याने किंवा गावातून दुसरीकडे स्थलांतरित झालेले असतील तर त्यांच्याही नावे त्या त्या बूथ समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.सरकारी बूथ लेवल अधिकाऱ्या बरोबरच राष्ट्रीय पक्षाचे प्रशिक्षित बूथ एजंट ही या मध्ये सक्रिय झाले असून या देशाचा नागरिक या नात्याने मतदार हा स्वतंत्र आहे, कुठल्याही पक्षाचा गुलाम नाही, म्हणूनच आपली नावे या मतदार फेरनिरीक्षण यादीत समाविष्ट करण्यासाठी आपले घर हाच बूथ व गाव,गल्ली हाच आपला वार्ड समजून प्रत्येक नागरिकाचे मतदार म्हणून नाव समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे अवाहन धनंजय पाटील यांनी खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta