







जटगे : जटगे गावचे सुपुत्र युवराज मळीक यांचे दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दाम्पत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
युवराज मळीक हे दि. १२ जून २०१९ रोजी भारतीय सैन्यदलाच्या (डोगरा रेजिमेंट) सेवेत रुजू झाले होते. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी त्यांनी आर्मीमध्ये प्रवेश केला. एकुलते युवराज लहानपणापासूनच आर्मीमध्येच काम करून देशसेवा करण्याची त्यांची इच्छा होती. आपल्या या स्वप्नाला त्यांनी मेहनत, जिद्द आणि कष्टांच्या जोरावर प्रत्यक्षात उतरवले.
गेली सात वर्षे भारतीय सैन्यदलात सेवा बजावत त्यांनी देशसेवा केली. कष्टाळू, मेहनती आणि जिद्दी स्वभावाचे युवराज कोणतेही काम प्रचंड ऊर्जा आणि मनापासून करण्यासाठी ओळखले जात होते. आपल्या कष्टाला मर्यादा न ठेवता प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्याची त्यांची वृत्ती होती.
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून वयाच्या २३व्या वर्षी सैन्यात दाखल झालेला गावचा हा सुपुत्र आज आपल्यात नाही, ही बाब संपूर्ण गावासाठी अत्यंत वेदनादायी आहे. अवघ्या दोन वर्षांच्या संसारानंतर पती-पत्नीचा असा दुर्दैवी अंत होणे ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.
दि. ८ सप्टेंबर रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर आज त्यांच्या अकराव्या दिवशी युवराज मळीक आणि त्यांच्या पत्नीच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
देशसेवा करणाऱ्या या कर्तव्यनिष्ठ जवानाच्या आठवणी सदैव गावकऱ्यांच्या आणि त्यांच्या आप्तस्वकीयांच्या मनात जिवंत राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🇮🇳
जय हिंद!

Belgaum Varta Belgaum Varta