







बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार, दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता शंकर-पार्वती मंगल कार्यालय, उचगाव येथे हा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक-चेअरमन जवाहरराव शंकरराव देसाई यांनी दिली.
यावेळी चंद्रशेखर गायकवाड यांना ‘साहित्य भूषण’, विश्वास नारायण धुराजी यांना ‘समाज भूषण’, शंकर लक्ष्मण पाटील यांना ‘सेवा भूषण’, रविंद्र धोंडीबा पाटील यांना ‘शिक्षक भूषण’, उत्तम प्रभाकर तरळे यांना ‘उचगाव भूषण’ आणि कु. साईशा पवन देसाई हिला ‘विद्या भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच उचगाव केंद्रातून एसएसएलसी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, निवृत्त सभासदांचा तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
रविंद्र धोंडीबा पाटील : ‘शिक्षक भूषण’
पोरेवाडी (ता. चंदगड) येथील गरीब कुटुंबात जन्मलेले रविंद्र धोंडीबा पाटील यांनी बी.ए., बी.एड. व सी.पी.एड. शिक्षण घेतले आहे. सध्या ते श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तुडये येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. 14 जुलै 1988 रोजी नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या श्री शिवशक्ती हायस्कूल, अडकूर येथून त्यांनी शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली.
आपल्या 38 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर प्रथम व तृतीय क्रमांक मिळविला असून 50 हून अधिक विद्यार्थी NMMS राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. एका वर्षात तब्बल 21 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविल्याची नोंद आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना ‘शिक्षक भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विश्वास नारायण धुराजी : ‘समाज भूषण’
77 वर्षीय विश्वास नारायण धुराजी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. बी.कॉम. पदवी घेतल्यानंतर त्यांनी मराठा बँकेत तब्बल 39 वर्षे सेवा बजावली आणि जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले.
निवृत्तीनंतरही समाजसेवेची आवड जोपासत त्यांनी जायंट्स ग्रुप, रामतत्त्व योग मंदिर, बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ, जालगार मारुती मंदिर व ज्योतिबा देवस्थान आदी विविध संस्थांमध्ये गेल्या 32 वर्षांपासून वेगवेगळ्या पदांवर कार्य केले आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाबद्दल त्यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
शंकर लक्ष्मण पाटील : ‘सेवा भूषण’
किणये येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले 76 वर्षीय शंकर लक्ष्मण पाटील यांनी गोगटे कॉलेजमधून बी.कॉम. पदवी घेतली. अरुण इंजिनिअरिंग, उद्यमबाग येथे 28 वर्षे सेवा बजावल्यानंतर ते परचेस मॅनेजर पदावरून निवृत्त झाले.
कविता लेखन, नाट्य आणि भजन गायनाची त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी 55 कविता लिहिल्या असून त्या विविध अंकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘सुशिक्षित समाजाला लागलेला कलंक’ या लेखालाही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
नाट्यक्षेत्रात ‘मराठा गडी यशाचा धनी’ आणि ‘जावळीचा झुंझार’ या नाटकांमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. भजन गायन स्पर्धांमध्ये त्यांनी विविध पारितोषिके मिळविली असून हार्मोनियम वादनासाठीही पुरस्कार प्राप्त केला आहे. मुंबई दूरदर्शन केंद्रावर त्यांनी भजन सादर केले आहे.
‘सप्तस्वरानंद’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 32 भजन मंडळांची स्थापना केली असून विविध ठिकाणी सुमारे 3,250 भजनांचे जाहीर कार्यक्रम सादर केले आहेत. श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर तसेच अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथेही त्यांनी भजन सादर केले आहे.
महाराष्ट्र भूषण, संगीत रत्न, बेळगाव भूषण, कला रत्न, व्होकेशनल अवॉर्ड, संत गाडगेबुवा जीवन पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक, भजन सम्राट, स्वर सुवर्ण आदी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल त्यांना ‘सेवा भूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
उत्तम प्रभाकर तरळे : ‘उचगाव भूषण’
उचगावचे सुपुत्र उत्तम प्रभाकर तरळे यांनी कारवार येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा पूर्ण केला. पुणे येथील कोलते-पाटील डेव्हलपर्समध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केला.
निवासी प्रकल्प, हॉटेल्स, हॉस्पिटल्स व विद्यापीठांच्या इमारतींचे बांधकाम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. बेळगावच्या विजयनगर येथे अभिषेक व अथर्व अपार्टमेंटसह विविध निवासी प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. प्रकल्पांच्या निमित्ताने त्यांनी परदेश दौरेही केले आहेत. सध्या ए.व्ही. व्हेंचर्स आणि कार्तिक बिल्डकॉन या संस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. त्यांच्या व्यावसायिक योगदानाबद्दल त्यांना ‘उचगाव भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
साईशा पवन देसाई : ‘विद्या भूषण’
उचगावची सुकन्या आणि संस्थेचे संस्थापक-चेअरमन जवाहरराव शंकरराव देसाई यांची नात कु. साईशा पवन देसाई हिने 2026 मध्ये झालेल्या एसएसएलसी परीक्षेत 98.56 टक्के गुण मिळवून बेळगाव जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला. आपल्या यशातून तिने उचगावसह बेळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
क्षेत्रीय मराठा संघ, बेळगावच्या वतीने तिचा ‘बेळगावची चॅम्पियन’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. तिच्या शैक्षणिक यशाबद्दल तिला ‘विद्या भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
चंद्रशेखर गायकवाड : ‘साहित्य भूषण’
चंद्रशेखर गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले साहित्यिक, कवी व कथालेखक आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांना कविता लेखनाची आवड निर्माण झाली. इयत्ता सातवीत त्यांचे वर्गशिक्षक असलेले कै. किल्लेकर सर हे ‘रामकुमार’ या टोपणनावाने कविता लेखन करणारे कवी होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे गायकवाड यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. महाविद्यालयीन जीवनात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कृ. ब. निकुंब यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या हिंदी कवितेला ‘अर्चना पुरस्कार’ प्राप्त झाला. त्यांचा ‘कळा या लागल्या जीवा’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला असून या संग्रहाला खानापूर येथील निसर्ग साहित्य संमेलनाचा कै. प्रा. वसंत कुलकर्णी काव्य पुरस्कार मिळाला आहे.
‘वाङ्मय चर्चा मंडळ’ येथे ग्रंथपाल तसेच एम.के. पब्लिसिटी या प्रकाशन संस्थेत व्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्य केले असून तेथून ते निवृत्त झाले. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta