






उद्या दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत विविध भागांत व्यवस्था; पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन
बेळगाव : घरगुती गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करता यावे, यासाठी महापालिका व विविध प्रशासनिक यंत्रणांतर्फे शहरातील विविध भागांत फिरत्या जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी, शुक्रवारी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
महापालिकेतर्फे शुक्रवारी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत भाग्यनगर पाचवा क्रॉस, पहिले रेल्वे गेट, गणेश चौक, जुना पी.बी. रोड, धाकोजी रुग्णालयासमोर, खासबाग बसवेश्वर चौक, खासबाग विश्वेश्वरनगर बसथांब्याजवळ, टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली, कणबर्गी देवस्थान रस्ता, सह्याद्रीनगर जलकुंभाजवळ आणि हिंडलगा केएचबी कॉलनीजवळ फिरते जलकुंड उपलब्ध राहणार आहेत. एकूण ११ वाहनांमधून ही सुविधा पुरविण्यात येणार असून, त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत रामतीर्थनगर वसाहत शिवालयाजवळ, स्टेट बँक ऑफ म्हैसूरजवळ, महांतेशनगर, नगर बॉक्साईट रोड, हनुमाननगर चौक, एसबीआय बँकेजवळील चन्नम्मानगर, लेले मैदान, व्हॅक्सिन डेपो, श्रीनगर उद्यानाजवळ, साईबाबा देवस्थानजवळ, वंटमोरी कॉलनी, शाहूनगर शेवटचा बसथांबा आणि हरी मंदिर, अनगोळ येथे जलकुंडांची सुविधा राहणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत किल्ला परिसर, कॅम्प पोलिस ठाण्याजवळ, लक्ष्मी देवस्थानजवळ, लक्ष्मी टेक, इस्लामिया कॉलेजजवळ आणि जुने पोस्ट ऑफिसजवळ जलकुंड उपलब्ध करण्यात आले आहेत.
दरम्यान, बुडा (बेळगाव नगरविकास प्राधिकरण) तर्फे याच वेळेत रामतीर्थनगर वसाहत, कुमारस्वामी लेआउट आणि ऑटोनगर येथे फिरत्या जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांनी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन नदी, तलाव किंवा जलस्रोतांमध्ये न करता प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या जलकुंडांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासोबतच गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यास मदत होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta