Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूरच्या भातशेतीत हत्तींचा धुमाकूळ; ग्रामस्थांनी हत्तींपासून दूर राहण्याचे वन विभागाचे आवाहन

Spread the love

खानापूर : खानापूर वन उपविभागातील विविध भागांत गेल्या आठवड्यापासून हत्तींच्या कळपाचा वावर सुरू असून, भातशेतीचे नुकसान होत आहे. हत्तींचा कळप पुन्हा जंगलात परतवण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून रात्रभर गस्त व ‘कुंबिंग’ मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत सुमारे नऊ हत्ती आढळून आले आहेत.

बुधवारी रात्री खानापूरचे एसीएफ बसवराज वाळद आणि वनक्षेत्र अधिकारी सय्यदसाब नदाफ यांच्या नेतृत्वाखाली रात्रभर मोहीम राबवण्यात आली. यावेळी भीमगड वन्यजीव क्षेत्रातील पाली गावाजवळील भातशेतीत हत्तींचा कळप असल्याचे स्पष्ट झाले. पाली, हेम्मडगा, अबनाळी, डोंगरगाव आणि शिरोळवाडा परिसरात हत्तींची हालचाल सुरू आहे. पाली गावाजवळ बुधवारी रात्री सात हत्ती दिसून आले. यामध्ये एक नर हत्ती तसेच दोन पिल्लांचा समावेश असल्याची माहिती आहे.

हत्तींना जंगलाकडे हुसकावण्यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून फटाके व इतर उपायांचा वापर करण्यात आला. मात्र, हत्ती जंगलात न जाता भातशेतीच्या कडेला फिरत राहिल्याने वन विभागासमोर आव्हान निर्माण झाले आहे. हत्तींच्या हालचालींवर ड्रोनच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात येत असून, वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हळियाळ, कॅसलरॉक, जंगळपेट, तिनईघाट आणि गणेशगुडी परिसरातील जंगलातून अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप खानापूरकडे आला असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. नर हत्तींसोबत पिल्ले असल्याने हा कळप अधिक धोकादायक ठरू शकतो.

वन विभागाने ग्रामस्थांना हत्तींच्या जवळ जाऊ नये, आरडाओरड करू नये किंवा फटाके फोडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. हत्ती दिसल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी. हत्तींकडून झालेल्या पीक नुकसानीची माहिती संकलित केली जात असून, नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल, असे डीसीएफ एन. ई. क्रांती यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *