







हैदराबाद : हैदराबादजवळील पेड्डा कंजर्ला गावात गणेशमूर्ती विसर्जनावेळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तलावात बुडून सहा बालकांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका सेवाभावी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात ही बालके राहत होती. गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या आठ बालकांचा अचानक तलावात तोल गेला आणि ते पाण्यात पडले. त्यापैकी दोन बालके पोहत तलावाबाहेर आली; मात्र उर्वरित सहा बालके पाण्यात बुडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका पोलिस कर्मचाऱ्याने बुडालेल्या बालकाला सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला वाचवता आले नाही. बालके तलावात पडली तेव्हा त्यांना तातडीने मदत करण्यासाठी कोणताही प्रौढ व्यक्ती घटनास्थळी उपस्थित नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तलावातील चिखलामुळेही बालके पाण्यात अडकून बुडाली असावीत, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या दुर्घटनेनंतर गणेशमूर्ती विसर्जनावेळी आवश्यक सुरक्षा व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच पीडित कुटुंबांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासह विविध नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

Belgaum Varta Belgaum Varta