







गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री भीषण अग्निकांड; धमुने कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, एक मुलगी बचावली
बेळगाव : गणेश चतुर्थीचा उत्साह… घरात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना… प्रसादाचे वितरण… नातेवाइकांसोबत आनंदाचे क्षण आणि उत्सवाचे फोटो स्टेटसवर अपडेट केल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांतच धमुने कुटुंबावर काळाने घाला घातला. गणेश चतुर्थीची मध्यरात्र या कुटुंबासाठी अक्षरशः काळरात्र ठरली. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या बापलेकांची मृत्यूशी सुरू असलेली झुंजही बुधवारी अखेर अयशस्वी ठरली. गजानन धमुने (65) आणि रोशन धमुने (21) यांचीही बुधवारी दुपारी प्राणज्योत मालवली. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहोचली.
शारदा धमुने, भारती धमुने, प्रिया धमुने आणि गंगा धमुने यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाची काळी छाया पसरली आहे.
गणरायाची प्रतिष्ठापना अन् काही वेळातच अनर्थ
एकाच पत्र्याच्या शेडमध्ये तीन विभाग असून, त्यातील शेवटच्या विभागात धमुने कुटुंब वास्तव्यास होते. गणेश चतुर्थीनिमित्त घरात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांना झोपण्यास उशीर झाला. रात्री एकच्या सुमारास सर्वजण झोपी गेले. गणेशोत्सवातील आनंदाचे क्षण टिपणारे फोटोही सोशल मीडियावर स्टेटसला ठेवण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच घरातून मोठा आवाज आला आणि क्षणार्धात घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. काही वेळापूर्वी हसत-खेळत असलेले कुटुंब अचानक मृत्यूच्या दाढेत सापडले.
काळ आणि वेळ यांची जणू भेटच!
आगीने इतके रौद्र रूप धारण केले होते की, अवघ्या दोन फुटांच्या जागेतूनही धमुने कुटुंबापर्यंत पोहोचणे कठीण झाले. शेजारच्या इमारतीवरून मदतीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तोपर्यंत चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता. आग विझवण्यासाठी टाकलेले पाणीही आगीच्या तीव्रतेमुळे अक्षरशः बाहेर फेकले जात होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अरुंद रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे अग्निशमन वाहनाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून अखेर आग आटोक्यात आणली.
गंभीर जखमी झालेल्या गजानन धमुने आणि रोशन धमुने यांना तातडीने रिक्षातून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दोघांचीही बुधवारी प्राणज्योत मालवली. त्यामुळे ‘काळ आणि वेळ यांची जणू भेटच झाली’ अशीच भावना परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
केवळ एक मुलगी बचावली!
या दुर्घटनेत धमुने कुटुंबातील दिशा ही एकमेव मुलगी बचावली. गणेश चतुर्थीनिमित्त पै-पाहुणे घरी आले होते. दिशाही या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिला रात्री घरीच थांबण्याचा कुटुंबीयांनी आग्रह केला होता. मात्र, मुलांच्या शाळेसह कौटुंबिक कारणांमुळे ती रात्री 11च्या सुमारास आपल्या सासरी निघून गेली. यामुळे नियतीने दिलेल्या या दुर्दैवी धक्क्यातून धमुने कुटुंबातील दिशा ही एकटीच बचावली आहे.
कपड्यांनी घेतला आगीचा भडका
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. घरात शिलाईसाठी आणलेले कपडे मोठ्या प्रमाणात असल्याने आगीला क्षणार्धात खाद्य मिळाले. नायलॉन व टेरीकॉटच्या कपड्यांमुळे आगीने अधिकच रौद्र रूप धारण केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरात फटाकेही असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली.
होरपळून निघालेले मृतदेह पाहून घटनास्थळी उपस्थित प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
गणेश दर्शनही बंद; मदतीसाठी समाज पुढे
गणेश चतुर्थीच्या आनंदोत्सवावर या घटनेने दुःखाची छाया पसरली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी बापलेकांचाही मृत्यू झाल्यानंतर दर्शन बंदच ठेवण्यात आले.
दरम्यान, गरजेनुसार अंत्यविधीसाठी मदतीचा हात देण्यात आला असून, प्रशासनाकडे पाठपुरावा तसेच राजकीय नेत्यांशी संपर्क साधून धमुने कुटुंबाला शासकीय व इतर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती समाजसेवक सुनील जाधव यांनी दिली.
गणेश चतुर्थीच्या उत्सवात उजळलेल्या घरात काही क्षणांतच काळोख पसरला. काही वेळापूर्वी ज्यांच्या घरात गणरायाचा जयघोष घुमत होता, त्याच घरातून काही तासांत आक्रोश आणि अश्रूंचा महापूर वाहू लागला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर अक्षरशः हेलावून गेला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta