Sunday , July 26 2026
Breaking News

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपचा बेळगावात एल्गार; काँग्रेस सरकारविरोधात भव्य चाबूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या बेळगाव ग्रामीण जिल्हा घटकाच्या वतीने सोमवारी बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, किसान मोर्चाचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोर्चानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्यातील शेतकरी आर्थिक व कृषी संकटाचा सामना करत असून सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात बेळगाव जिल्ह्याला तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, शेतीसाठी नियमित आणि अखंडित वीजपुरवठा करावा, बंद करण्यात आलेली ‘रयत सन्मान निधी’ योजना पुन्हा सुरू करावी तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना पूर्ववत लागू करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनाचे नेतृत्व भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, कित्तूरचे माजी आमदार महांतेश दोड्डगौडर, बेळगाव विभाग प्रभारी संजय पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक प्रदेश सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

किसान मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कबाबत हुबळीचे हेस्कॉमचे अध्यक्ष अजमपीर खाद्री यांना राजेंद्र वड्डर- पवार यांचे निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क गेल्या पाच वर्षापासून बंद स्थितीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *