Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरातील लक्ष्मी देवी यात्रा समितीच्या बैठकीत हिशोबावरून गोंधळ

Spread the love

 

आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले; पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला

संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात होणाऱ्या श्री लक्ष्मी देवी यात्रेच्या पूर्वतयारी बैठकीत मागील यात्रेच्या हिशोबावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपांमुळे बैठकस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

संकेश्वर येथील श्री लक्ष्मी देवी समुदाय भवनात यात्रा समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विविध समाजांचे नेते, समिती सदस्य आणि मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत सुनील पर्वतराव, नंदू मुडसी, गजानन कोळी आणि रोहन नेसरी यांनी मागील यात्रेचा हिशोब व्यवस्थित सादर करण्यात आला नसल्याचा आरोप केला. तसेच काही पावती पुस्तके गहाळ असून निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

यावर यात्रा समितीचे सचिव बसगौडा पाटील यांनी सर्व व्यवहार नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने झाल्याचे सांगत हिशोबाची सविस्तर माहिती दिली. मात्र, दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक वाढल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाला.

अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी यांनी हिशोबात कोणतीही त्रुटी नसल्याचे स्पष्ट केले. तरीही वातावरणातील तणाव कायम राहिल्याने पोलीस निरीक्षक गणपती कोगनळ्ळी आणि उपनिरीक्षक विठ्ठल नाईक यांनी घटनास्थळी मध्यस्थी करत दोन्ही गटांची समजूत काढली.

यानंतर अमर नलवडे यांनी काही जण केवळ समितीत स्थान मिळवण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा केला. अखेरीस पंच समितीचे सदस्य कुणाल पाटील यांनी सर्व समाजाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन यात्रा शांततेत पार पाडली जाईल, तसेच मंगळवारी धार्मिक विधीने यात्रेला प्रारंभ होणार असल्याचे जाहीर केले.

बैठकीला संजय शिरकोळी, श्रीकांत हतनुरे, शंकरराव हेगडे, पवन कणगले, अजित करजगी, अविनाश नलवडे, विजय जरळी, संतोष मुडसी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, यात्रेसारख्या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर समितीतील अंतर्गत वादामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, यात्रा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान समितीसमोर आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *