Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूरच्या पाण्यावरून खानापूर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल; ‘तालुक्याचे हक्काचे पाणी बाहेर का?’

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात भविष्यातील पाणीटंचाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, तालुक्याचे हक्काचे पाणी इतर भागात वळवले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते सुरेश भाऊ जाधव यांनी आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
सुरेश भाऊ जाधव म्हणाले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटत असून यंदाही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. भविष्यात पावसाचे प्रमाण आणखी कमी झाल्यास खानापूर तालुक्यावर पुन्हा पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते. अशा परिस्थितीत तालुक्याचे हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्यात नेले जात असताना लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी मौन का बाळगत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जांबोटी परिसरातील भाजप पदाधिकारीही या विषयावर चिडीचूप असल्याचा आरोप करत, उन्हाळ्यात बैलूरसह अनेक गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते, बोअरवेल खोदण्याची वेळ येते, हे वास्तव असताना तालुक्यातील पाणी बाहेर नेण्यास परवानगी का दिली जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.

पारिश्वाड आणि कुसमळी भागातून यापूर्वी पाणी उचलण्यात आले असून, आता नेरसा परिसरातून मलप्रभा नदीचे पाणी बंद पाइपलाइनद्वारे उचलण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला. “आगामी काळात आणखी किती ठिकाणांहून पाणी बाहेर नेले जाणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“खानापूरसारख्या सुजलाम-सुफलाम तालुक्याला पाण्याच्या बाबतीत वाळवंट करण्याचा प्रयत्न सुरू आहे का?” असा थेट प्रश्न विचारत जाधव यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर “साटेलोटे” असल्याचा आरोप केला. या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *