Sunday , July 26 2026
Breaking News

हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांचा बेळगावात एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी जनावरांसह आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे जनावरांसह धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित दिरंगाईविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

धरणासाठी जमीन संपादित करूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप योग्य मोबदला व जमिनीचा परतावा मिळालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत शहरातून निषेध मोर्चाही काढला.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते बाळेश मावनूर यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अनेक बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. मात्र, पाटबंधारे महामंडळातील काही अधिकारी निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करत नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा लढा सरकार किंवा महसूल विभागाविरोधात नसून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरोधात आहे. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असतानाही जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा आरोप करत, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाटबंधारे महामंडळाच्या उत्तर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांसोबत विशेष बैठक बोलावण्यात आल्याची माहिती दिली. या बैठकीला आंदोलकांच्या चार ते पाच प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीत संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा केली जाईल. वस्तुस्थितीची खातरजमा करून आवश्यक असल्यास राज्य सरकारकडे स्वतंत्र अहवाल पाठविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कबाबत हुबळीचे हेस्कॉमचे अध्यक्ष अजमपीर खाद्री यांना राजेंद्र वड्डर- पवार यांचे निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क गेल्या पाच वर्षापासून बंद स्थितीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *