घरांच्या नुकसानीची भरपाई जाहीर
बंगळूर (वार्ता) : अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यातील १३ जिल्हे प्रभावित झाले असून तेथील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ५१० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रविवारी बंगळुरमध्ये बोलताना दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एनडीआरएफच्या नियमानुसार, पूर्ण नुकसान झालेल्या घराला पाच लाख रुपये, आंशिक नुकसान झालेल्या घराला तीन लाख रुपये, किरकोळ नुकसान झालेल्या घराला ५० हजार रुपयाची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, पुरामुळे राज्यातील ४६६ गावे प्रभावित झाली आहेत. येथील पीके व घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे १३ लोकांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. पूरग्रस्त गावातील रस्त्यांचीही मोठी दुरावस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर, संपर्क रस्त्यांच्या पुनर्बांधणीची व्यवस्था करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. वित्त सचिवांशीही या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सध्या ५१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
एनडीआरएफकडून १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत. यासाठी सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर ७०० कोटी रुपये शिल्लक आहेत. पूरग्रस्त भागातील पूराच्या नुकसानीचा अजून अंदाज घेण्यात आलेला नाही. येत्या १५ दिवसात पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, मी राज्यातील पूर परिस्थिती बाबत केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती केली आहे.