बेंगळुरू : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विमानतळांवर येणार्या प्रवाशांची सक्तीने आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आज बुधवारी बेंगलोर विमानतळाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विमानतळावर येणार्या प्रवाशांची सक्तीने आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात येईल.
याबाबत आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांनाही सूचना देण्यात आली आहे. कोरोना चाचणीच्या सक्तीमुळे प्रवाशांना काही काळ विलंब होऊ शकेल, मात्र ओमिक्रॉनचा खात्मा होईपर्यंत सर्वांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्या आपण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आरोग्य खात्याच्या फ्रन्टलाइन वॉरियर्सने कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेऊन सात-आठ महिने झाले आहेत.
त्यांच्यातील रोग प्रतिकार शक्ती कमी होत चालली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांना तिसरा बूस्टर डोस देण्यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. बूस्टर डोस देण्यास केंद्राने मंजुरी दिली तर त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येईल असेही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात क्वॉरन्टाईन, होम कॉरन्टाईन अॅप, टेलीमेडिसीन, टेस्ट्स अर्थात चाचण्या वाढविल्या आहेत. सामाजिक अंतर राखणे फेसमास्क वापरण्यासह सर्व उपाय करण्यात येतील. त्यामुळे समस्त नागरिकांनी सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलात म्हणून ओमिक्रॉनचे समूळ उच्चाटन होईपर्यंत सरकारला सहकार्य करावे, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शेवटी सांगितले.
