बेळगाव : एका मंत्री आणि भाजप आमदाराच्या जमीन बळकावल्याच्या आरोपांवर आज शुक्रवारी विधानसभेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. यावेळी सिद्धरामय्या यांच्या मागणीला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी गटातील आमदारांनी एकच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभापती विश्वनाथ कागेरी हेगडे यांनी, आजच्या दिवसाचे काम आटोपते घेतले.
एका मंत्री आणि भाजप आमदाराच्या जमीन बळकावल्याच्या आरोपांवर चर्चेची मागणी करणार्या काँग्रेसच्या 14 सदस्यांना विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी बुधवारी एक दिवसासाठी निलंबित केले होते. त्यानंतर आज शुक्रवारी याच विषयावर सिद्धरामय्या यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळात तत्कालीन गृहमंत्री जॉर्ज यांच्या विरोधात झालेल्या आरोपांवरून चर्चेची मागणी त्यावेळी भाजप आमदारांनी केली होती. याची आठवण त्यांनी करून दिली. मंत्री जॉर्ज यांच्या विरोधात एफआयआर दाखल नसतानाही त्यावेळी भाजपने विधानसभेत चर्चेचा मुद्दा उपस्थित केला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर जॉर्ज यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता, भाजपच्या ज्या मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या मंत्र्याने पदाचा राजीनामा द्यावा. सदर विषयावर सभागृहात चर्चा केली जावी, अशी मागणी सिद्धरामय्या यांनी केली.
सिद्धरामय्या यांच्या मागणीला मुख्यमंत्री बोम्माई यांनी विरोध दर्शविला. संसदीय कामकाज मंत्री माधूस्वामी यांनीही सदर प्रकरण न्यायालयात दाखल असल्यामुळे त्यावर सभागृहात चर्चा करता येत नाही अशी बाजू मांडली. त्यावेळी सिद्धरामय्या यांनी सरकारच्या कृतीचा जोरदार विरोध केला. काँग्रेसच्या आमदारांनी सभापतींच्या आसनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस आमदारांच्या घोषणाबाजीला भाजपच्या आमदारांनीही जोरदार घोषणांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सभापतींना कामकाज सोमवारपर्यंत पुढे ढकलावे लागले आहे.
