बेळगाव (वार्ता) : सुवर्णसौधमधील अधिवेशनात काल वादग्रस्त विधान केलेल्या माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आ. के. आर. रमेशकुमार यांनी अखेर माफी मागितली. शुक्रवारी सायंकाळी विधानसभेत रमेशकुमार यांनी बलात्कारावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली. सर्वपक्षीयांनीही टीका केली. आपल्या विधानावरून आता रणकंदन माजणार हे लक्षात आल्याने रमेशकुमार यांनी आज, शुक्रवारी विधानसभेत माफी मागितली. मी केवळ इंग्लिशमधील एका म्हणीचा दाखला दिला होता. महिलांचा अपमान करावा, सभागृहाची प्रतिष्ठा कमी व्हावी या उद्देशाने बोललो नव्हतो. काही वेळा अनावधानामुळे तोंडातून काही शब्द निघून जातात. त्यामागे वाईट हेतू नसतो. माझ्या कालच्या विधानामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, कोणाला वाईट वाटले असेल तर शुद्ध मनाने, प्रामाणिकपणे मी त्यांची माफी मागतो. या विषयाला येथेच विराम देऊ. सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु ठेवू असे रमेशकुमार यांनी सांगितले. त्यानंतर सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी म्हणाले, आम्ही सगळे एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे आहोत. आम्हालाही सांसारिक भावना, नाती आहेत. मीसुद्धा काल लेट अस एन्जॉय द सिच्युएशन असे रमेशकुमार यांना म्हणून गेलो. त्यावरून त्यांनी ते विधान केले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. महिलांचा हे सभागृह सन्मान करते. तो आणखी वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कालच्या घटनेवरून कोणी वाद निर्माण करू नये असे आवाहन सभापतींनी केले. यावेळी काँग्रेस आ. अंजली निंबाळकर यांनी हा केवळ रमेशकुमार यांचा प्रश्न नाही संपूर्ण सभागृहाने माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. तर काही आमदारांनी हे विधान कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्याची मागणी केली.
Check Also
विश्वविख्यात म्हैसूर दसरा महोत्सवाची आज जंबो सवारीने सांगता
Spread the love बंगळूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाच्या नेत्रदीपक जंबोसावरी मिरवणुकीला आज (१२ ऑगस्ट) …