बेळगाव : बेळगावसह सीमाभागात घटनेची पायमल्ली करून जर मराठी जनतेवर अन्याय केला जात असेल तर याची माहिती मी नक्कीच माननीय पंतप्रधानांच्या कानावर घालेन, असे आश्वासन महाराष्ट्राचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाला दिले.
बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी आज शुक्रवारी सकाळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला आणि सीमाप्रश्नांसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणार्या अन्याय संदर्भातील निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला व बेळगावातील परिस्थितीची कल्पना त्यांना देण्यात आली.
निवेदन स्वीकारून बोलताना दीपक दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला असो किंवा मराठी भाषकांवरील दडपशाही असो, घटनेची पायमल्ली करून घटनेने दिलेले अधिकार बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना मिळत नसतील तर त्याची कल्पना आपण नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालू, असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिष्टमंडळाला दिले.
त्याप्रसंगी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव बिलोंग्ज टू महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष पियुष हावळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.
Check Also
सायकल फेरीत सामील झालेल्यांवर कडक कारवाई करणार : मंत्री सतीश जारकीहोळी
Spread the love बेळगाव : जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने १ नोव्हेंबर …