बेळगाव (वार्ता) : आपले अपयश झाकून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच भाजप धर्मांतर विरोधी कायदा आणू पहात आहे असा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला. बेळगावात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना धर्मांतर बंदी कायद्याबाबतच्या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले, हा कायदा गरजेचं आहे का? भाजप लोकांचे ध्यान इतरत्र वळवण्यासाठी हा कायदा आणत आहे. जबरदस्तीने धर्मांतर करणार्यांवर गुन्हे दाखल करा, शिक्षा द्या, गुळीहट्टी शेखर यांनीही हीच मागणी केली होती ना?, मग त्यांच्या आईने तक्रार दिली का? असा सवाल त्यांनी केला. लव्ह जिहाद, धर्मांतर हे भावनिक विषय आहेत. भाजपने त्यांचाच अजेंडा बनवला आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. विधान परिषद निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, या निवडणुकीत आम्हीही जिंकलो, भाजपही जिंकला. परंतु एकूण 94 हजार मतांपैकी 44 हजार मते काँग्रेसला मिळाली आहेत. भाजपला 34 हजार आणि जेडीएसला 10 हजार मते मिळाली आहेत. हे मतदान काय दर्शवते? काँग्रेस सत्तेवर यावा हीच लोकांची इच्छा आहे. मतदान केलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्य मतदारांचीसुद्धा हीच इच्छा आहे असा दावा सिद्धरामय्यांनी केला.
