खानापूर : गेल्या अनेक महिन्यापासून खराब झालेल्या कापोली शिवठाण ते कोडगई रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी सकाळी १०.३० खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शिवठाण येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कापोली ते कोडगई रस्त्यावरून दररोज अधिक प्रमाणात वर्दळ असते. तसेच खानापूर ते लोंढा रस्ताचे काम अर्धवट असल्याने रामनगरकडे जाण्यासाठी अनेकजण या मार्गाचा वापर करीत आहेत. मात्र रस्ताचे डांबरीकरण करण्यात आल्यापासून आत्तापर्यंत एकदाही रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या रस्ताची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या रस्तावरून ये-जा करणे अवघड जात असून याबाबत या भागातील नागरिकांनी अनेकदा रस्ता करण्याची मागणी केली आहे. तरीही अनुदान नाही असे सांगत रस्त्याची डागडुजी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने युवा समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रशासनाचे लक्ष वेधून घ्यावे असे आवाहन खानापूर तालुका युवा समितीतर्फे करण्यात आले आहे.
