
बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडसाठी मागणी करूनही बिम्सकडून त्याची पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे श्वसनाचा त्रास होऊन पत्रकार संजीवकुमार नाडगेर (वय 49) यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पत्रकार संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मागील 20 वर्षांपासून राज्यस्तरीय कन्नड दैनिकात पत्रकार म्हणून सेवा बजावल्यानंतर सध्या स्वतःचे न्युज पोर्टल चालवित असलेले पत्रकार संजीवकुमार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असताना जिल्हा रुग्णालयाकडून कोरोना नसल्याचा अहवाल देण्यात आला.
बेळगाव जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडसाठी मागणी करूनही बिम्सकडून त्याची पूर्तता करण्यात आली नाही, उलट कोरोना नाही असा चुकीचा अहवाल देण्यात आल्याने पत्रकार संघटनेकडून संताप व्यक्त होत आहे.
नाडगेर यांच्या मृत्यूचा योग्य अहवाल देऊन त्यांना सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा काही पत्रकारांनी दिला आहे.