पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
तिच्या संस्कारांचा प्रभाव राजेंद्रबाबूंच्या जीवनावर अखेरपर्यंत होता. राजेंद्रबाबूंचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपरिक पद्धतीने झाले. पुढे छपरा, हथवा व पाटणा या ठिकाणी शालेय शिक्षण घेऊन त्यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बी. ए., एम. ए., बी. एल (१९०९) व एम. एल. या पदव्या मिळविल्या.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर नेते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील जीरादेई या खेड्यात झाला. त्यांचे आजोबा चौधुरलाल हे हथवा संस्थानाचे दिवाण होते. त्यांचे वडील महादेव सहाय हे समाजसेवा करीत. ते युनानी व आयुर्वेदीय औषधोपचार करणारे हौशी वैद्य होते. आई कमलेश्वरीदेवी धार्मिक वृत्तीची होती.
तिच्या संस्कारांचा प्रभाव राजेंद्रबाबूंच्या जीवनावर अखेरपर्यंत होता. राजेंद्रबाबूंचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपरिक पद्धतीने झाले. पुढे छपरा, हथवा व पाटणा या ठिकाणी शालेय शिक्षण घेऊन त्यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बी. ए., एम. ए., बी. एल (१९०९) व एम. एल. या पदव्या मिळविल्या. विद्यार्थीदशेतच त्यांनी स्वदेशी व लोकसेवेचे व्रत घेतले. सुरुवातीस काही वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले. नंतर कोलकाता उच्च न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला. ते पुढे १९११ मध्ये काँग्रेसचे सभासद झाले.
बिहारच्या १९१७ च्या चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी महात्मा गांधींशी त्यांचा परिचय वाढला. त्यांनी महात्मा गांधींच्या चतुःसूत्रीचा पुरस्कार केला आणि वकिली व्यवसाय सोडला. पाटण्यात त्यांनी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापून स्वदेशी, मद्यपानबंदी, खादीचा प्रसार इ. कार्यक्रम हाती घेतले.
पंडित नेहरूंनी २ सप्टेंबर १९४६ रोजी हंगामी सरकार बनविले. या राष्ट्रीय मंत्रिमंडळात अन्नमंत्री म्हणून राजेंद्रबाबूंचा समावेश झाला. त्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती स्थापण्यात आली. या समितीने तीन वर्षांच्या परिश्रमानंतर भारताची राज्यघटना मंजूर केली. त्यानुसार प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्रबाबूंचा शपथविधी झाला (१९५०). त्यांनी आपले वेतन कमी करून घेतले आणि राष्ट्रपती भवनातील शाही राहणीमानात आमूलाग्र बदल केला. अशा या महान नेत्याचे २८ फेब्रुवारी १९६३ रोजी निधन झाले.