गोव्यात ‘उद्योगपती मित्रांना‘ फायदा मिळावा म्हणून भाजपचे प्रयत्न: प्रियंका गांधी
गांधी यांनी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचून दाखवला.
पणजी-गोव्यातील लोकांनी कॉंग्रेस पार्टीला एक संधी द्यावी. आम्ही गोव्याच्या विकासासाठी दिवस रात्र काम करू. आम्हाला गोवा परत एकदा गोमंतकीयांच्या हातात द्यायचा आहे, असे आज माजोर्डा येथील आयोजित सभेत जनतेला संबोधताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या.
दरम्यान, गांधी यांनी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचून दाखवला. त्या म्हणाल्या, कोरोना, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे राज्यातील लघु व मध्यम व्यवसायांना प्रचंड नुकसान झाले आहे. यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. या व्यवसायांना परत उभे करणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पार्टी यावर काम करेल.
महिलांबाबत बोलताना गांधी म्हणाल्या, ‘कॉंग्रेस पार्टी सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमद्धे 30% जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जातील. मडगाव आणि पणजीत वर्किंग वुमन्स हॉस्टेल उभारण्यात येईल. याचबरोबर न्याय योजनेतून गरीब कुटुंबाला महिन्याकाठी 6 हजार देण्याची देखील त्यांनी आश्वासन दिले आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असे की काँग्रेसने दिलेली आश्वासनं पूर्ण होतील का. मात्र आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. मागच्या निवडणुकीत काय झालं हे स्पष्ट आहे. काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली गेली. आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा मिळावा म्हणून भाजपकडून पावलं उचलली गेली, अशा शब्दात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. गोव्यातील माजोर्डा येथे आयोजित सभेत प्रियांका गांधींनी भाजप सरकारवर शरसंधान साधलं.
माझ्या आजीने देशातला एकमेव ओपिनियन पोल घेतला होता. ज्यात गोवा महाराष्ट्रात राहायला हवं की नाही यासाठी मतदान घेतलं होतं. आज आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा तसंच गोवा परत देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. तसंच भाजपसाठी गोवा ही फक्त त्यांची ग्रीड पूर्ण करण्यासाठी आहे. त्यांना आणि त्यांच्या उद्योजक मित्रांना फायदा करुन घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न असतात अशा शब्दात प्रियांका गांधींनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.