बेळगाव : केंद्र सरकारच्या शेतकरी–कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बेळगावात शनिवारी शेतकऱ्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे फडकावत निदर्शने केली. केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा आणि कामगार कायद्यांचा निषेध यावेळी करण्यात आला.
बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शनिवारी दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे फडकावत निदर्शने केली. यावेळी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी म्हणाले, ‘१९७५ प्रमाणेच सध्याही देशात अघोषित आणीबाणी लादली गेली आहे. लोकशाही मूल्ये, घटनात्मक व्यवस्था आणि जन्मताला किंमत न देता केंद्र सरकारने वटहुकूमाच्या माध्यमातून कृषी आणि कामगार सुधारणा कायदे आणले आहेत. त्याविरोधात शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होऊनही त्याची दखल घेतली नाही. १९७५ मध्ये लादलेली आणीबाणी आणि आताच्या परिस्थितीत फारसा फरक राहिलेला नाही. केंद्र सरकार हुकूमशाप्रमाणे वागत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.
निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय कृषक समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.